इंधन दरवाढी विरोधात ठाण्यात स्वाक्षरी मोहीम

 ठाणे (प्रतिनिधी) - पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, गॅस सिलिंडरच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तसेच शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.            केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे इंधन, गॅस सिलिंडरसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे उसळलेल्या महागाईविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी राज्यभरात आंदोलनाची घोषणा केली आहे. त्याचा भाग म्हणून ठाण्यातील वर्तक नगर परिसरात हे अभियान राबविण्यात आले.             एका भल्या मोठ्या बॅनरवर वर्तक नगर-भीम नगर परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेऊन इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. विशेष म्हणजे, या बॅनरवर गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीदेखील सही केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम खामकर, ब्लॉक अध्यक्ष संदीप वेताळ, अजय सकपाळ, ज्योती चव्हाण, वॉर्ड अध्यक्ष विजय यादव आदी उपस्थित होते.               हे अभियान सबंध शहरभर राबविण्यात येणार असून इंधन दरवाढीचा निषेध करणारे हे बॅनर शहरभर लावून नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात येणार आहेत. स्वाक्षर्‍या करण्यात आलेले हे बॅनर प्रधानमंत्री कार्यालयास पाठविण्यात येणार आहेत, असे यावेळी विक्रम खामकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments