महत्वपूर्ण प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी - विभागीय आयुक्त विलास पाटील
ठाणे, दि.२१ ( जिमाका) :  जिल्ह्यात सुरु असलेल्या महत्वपूर्ण प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला अधिक गती द्यावी या कामी येणाऱ्या अडचणी तत्काळ दूर करुन भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी आज येथे दिले.           जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात विभागीय आयुक्त श्री.पाटील यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्ग, डीएफसीएल, कल्याण-कसारा रेल्वे मार्ग आणि समृध्दी महामार्ग याबाबतचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पुनर्वसन उपायुक्त पंकज देवरे, ठाण्याच्या अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी आदि यावेळी उपस्थित होते.           हे महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प असून त्याच्या कामांना गती मिळण्यासाठी वेळेत भूसंपादन होणे आवश्यक आहे, भूसंपादना अभावी प्रकल्पाचे काम रखडू नये यासाठी यंत्रणांनी भूसंपादनात येणाऱ्या अडचणींवर  मार्ग काढावा, असे श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.             यावेळी ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकल्पांसाठी त्या-त्या तालुक्यात भूसंपादन झालेल्या कामाचा आढावा सादर केला.             बैठकीस  उपजिल्हाधिकारी भूसंपादन प्रशांत सुर्यवंशी, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन रेवती गायकर, ठाण्याचे प्रांताधिकारी अविनाश शिंदे, उल्हासनगर प्रांताधिकारी जयराज कारभारी, कल्याणचे प्रांताधिकारी अभिजित भांड,  भिवंडीचे प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्यासह बुलेट ट्रेन, राष्ट्रीय महामार्ग, डीएफसीएल या प्रकल्पांशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments