गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या दुरावस्थे बाबत कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे आंदोलन


■एमएसआरडीसीने हा रस्ता केडीएमसीकडे हस्तांतरित करण्याची मागणी..


   

कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत एमएसआरडीसीच्या अखत्यारीत असणाऱ्या गोविंदवाडी बायपास रस्त्याची दुरवस्था झाली असून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांच्या नेत्तृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.       कल्याण पश्चिमेतील पत्री पूल बायपास ते दुर्गाडी किल्ला या गोविंदवाडी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. रस्त्यावरील मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने रस्त्य्वावर असणाऱ्या अंधारामुळे खड्डे दिसत नसल्याने येथील अपघातांची संख्या देखील वाढली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पथदिव्यांचे एक लाख ५९ हजार ५४० रुपये वीजबिल थकविले असल्याने या पथदिव्यांची वीज कापण्यात आली आहे.       एमएसआरडीसी या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने हा रस्ता केडीएमसीकडे हस्तांतरित करून केडीएमसीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने केली आहे. या मागणीसाठी पत्रीपूल बायपास सर्कल येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त न केल्यास आणि पथदिवे सुरु न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख आणि उपाध्यक्षा शिफा पावले खटखटे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments