कळवा- मुंब्रा भागात दूषित पाण्याचा पुरवठा विरोधी पक्षनेत्यांचा आयुक्त दालनाबाहेर ठिय्या महासभेतच कोरोना येतो का?- शानू पठाण




ठाणे (प्रतिनिधी) - मागील काही दिवसांपासून कळवा- मुंब्रा भागात पाण्याची मोठया प्रमाणात टंचाई आहे. चार-चार दिवस  पाणी गायब झालेले असतानाच दूषित पाण्याचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत अधिकार्‍यांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दूषित पाण्यासह  थेट पालिका आयुक्तांचे दालन गाठून ठिय्या आंदोलन केले.  



          तब्बल दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिलेल्या आश्वासनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, ठाणे शहरासह राज्यभर शाळा सुरु झालेल्या असतानाही प्रत्यक्ष महासभा घेतली जात नाही. ठाणेकरांचे प्रश्न सभागृहात मांडले जाऊ नयेत, यासाठीच प्रत्यक्ष महासभा होत नसल्याचा आरोप करीत ठाणे पालिकेच्या महासभेतच कोरोना येतो का, असा सवालही यावेळी पठाण यांनी केला.  

 


             सध्या एमआयडीसीच्या वतीने जुन्या जलवाहीन्या बदलण्याचे काम सुरु आहे. परंतु ते सुरु असतांना वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने त्याचा परिणाम कळवा, मुंब्य्रातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या भागात पाण्याची समस्या तीव्र स्वरुपात निर्माण झाली आहे. याच पाण्याच्या मुद्यावरुन राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील पाणी पुरवठा सुरळीत केली नाही तर महापालिकेकडे बघावे लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतर या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत झाला नसल्याचेच दिसून आले आहे.



          दरम्यान, पाण्याच्या याच मुद्यावरुन विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी सोमवारी सकाळी आठ वाजेपासून पाण्याची टंचाई असलेल्या भागाची पाहणी करुन दुपारी 1 वाजता महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. जो र्पयत पाण्याच्या समस्येवर तोडगा निघत नाही, तोर्पयत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. 



           पाण्याची समस्या असतांना मुंब्य्रात जे पाणी सोडले जात आहे, ते देखील गढूळ स्वरुपात येत असल्याने तेच गढूळ पाणी घेऊन त्यांनी ठिय्या मांडला होता. अखेर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची मनधरणी केली. त्यानुसार पाण्याचे प्रेशर वाढविण्याबरोबर येथील टाकीच्या समस्या सोडविली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.

Post a Comment

0 Comments