एमएसआरडीसीने वीज बिल न भरल्याने गोविंदवाडी बायपास अंधारात■या रस्त्यावरील पथदिवे सुरु करण्यासाठी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे आंदोलन...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : एमएसआरडीसीने वीज बिल न भरल्याने कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी बायपास रस्ता गेल्या महिनाभरापासून अंधारात असून या रस्त्यावरील पथदिवे सुरु करण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांच्या नेत्तृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.       कल्याण पश्चिमेतील पत्री पूल बायपास ते दुर्गाडी किल्ला या गोविंदवाडी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास होत होता. रस्त्यावरील मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याबाबत काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने आंदोलन केल्यानंतर येथील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र पथदिवे बंद असल्याने या रस्त्य्वावर अपघात होत आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पथदिव्यांचे एक लाख ५९ हजार ५४० रुपये वीजबिल थकविले असल्याने या पथदिव्यांची वीज कापण्यात आली आहे.       एमएसआरडीसी या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने हा रस्ता केडीएमसीकडे हस्तांतरित करून केडीएमसीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने केली आहे. या मागणीसाठी गोविंदवाडी बायपास मीठ बंदर रोड येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हे दाखल केले.         एमएसआरडीसीने लवकरात लवकर या रस्त्यावरील पथदिव्यांचे थकीत वीजबिल भरून पथदिवे सुरु न केल्यास याठिकाणी रास्ता रोको करत उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलीम शेख आणि उपाध्यक्षा शिफा पावले खटखटे यांनी दिला आहे.                दरम्यान याबाबत एमएसआरडीसीचे अधिकारी अनिरुद्ध बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता महावितरणचे थकीत वीज बिल आज भरणार असून हा रस्ता केडीएमसीला हस्तांतरित केला असल्याचे सांगितले.   

Post a Comment

0 Comments