ब्रह्मांड कट्टा अंतर्गत कला संस्कार तर्फे नवदुर्गांचा सन्मान!

 ठाणे  , प्रतिनिधी  : सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर ब्रह्मांड कट्ट्याचा आगळ्यावेगळ्या व प्रोत्साहनपर उपक्रम राबवण्याबद्दल नावलौकिक आहे. नवरात्र उत्सवात नऊ दिवस आदिशक्तीच्या नऊ विविध रुपांची पूजा केली जाते. परंतु प्रत्येक स्त्रीमध्ये एक दुर्गादेवी दडलेली असून तिचा रोजच सन्मान झाला पाहिजे या प्रेरणादायी विचारातुनच ब्रह्मांड कट्टा अंतर्गत कलासंस्कारने शारदीय नवरात्रौत्सवाचे औचित्य साधत 'ब्रह्मांड नवदुर्गा सन्मान सोहळा: २०२१' या नेत्रदिपक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ब्रह्मांड परिसरातील नऊ महिलांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.           कार्यक्रमाची सुरुवात कलासंस्कारच्या अध्यक्षा वर्षा गंद्रे, उपाध्यक्षा विद्या जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक अपर्णा पटवर्धन व सदस्या पूनम रेडेकर यांनी सुंदर तालबद्ध भोंडला गीतांनी केली. वर्षा गंद्रे यांनी स्वरचित पर्यावरण संरक्षण भोंडल्यातुन सुंदर संदेश जनमानसांत पोहोचवला. कलासंस्कारचे धडाडीचे नेतृत्व वर्षा यांनी कलासंस्कारची माहिती देत मान्यवरांचे स्वागत केले. ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांनीही सत्कारमूर्तींचे स्वागत करत मार्गदर्शन केले व ब्रह्मांड कट्टयाच्या कार्याविषयी श्रोत्यांशी संवाद साधला. कलासंस्कारच्या सचिव ऋजुता देशपांडे यांनी कार्यक्रमाचे अत्यंत साचेबद्ध नियोजन व प्रभावी सूत्रसंचालन करुन कार्यक्रम परिणामकारकरित्या रसिकांपर्यंत पोहोचवला.          सुनीला वैद्य ( पौरोहित्य), रुपाली खराडकर ( सामाजिक), श्रीदेवी बारभाई ( प्रशासकिय: वकिल), उषा रायचौधरी  ( सामाजिक), अपर्णा पटवर्धन ( साहित्य), डॉ. रेखा थोटे ( वैद्यकिय), संगीता खरे ( उद्योग), सीमा राजेशिर्के ( फोटोग्राफी), मधुगंधा इंद्रजीत ( जादू) या नवदुर्गांचा सन्मानपत्र, गौरवचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर या सर्व मान्यवर महिलांची खुमासदार त्याचबरोबर माहितीपूर्ण मुलाखत ऋजुता यांनी घेतली.          हा सुसंवाद केवळ मनोरंजक नसुन सामाजिक जाणीव, आरोग्यविषयक जागरुकता, सकारात्मकता, भाषा अभ्यास अशा अनेक अभ्यासपूर्ण विषयांवर नवदुर्गांनी चर्चा केली. या मुलाखतीला चार चांद लावले ते जादुगार मधुगंधा यांनी. मधुगंधा यांनी नकळतरित्या मंचावर जादुचे प्रयोग करुन श्रोत्यांना थक्क केले.            वर्षा यांनी आभार प्रदर्शन करुन कार्यक्रमाची सांगता केली. नारी सन्मानाचा हा नयनरम्य व प्रेरणादायी सोहळा म्हणजे ब्रह्मांड कट्टयाच्या शिरपेचातील मानाचा तुरा असून पुनश्च ब्रह्मांड कट्टयाने सामाजिक कार्याचा ध्वज रोवला.

Post a Comment

0 Comments