Header AD

यंदाचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापौर व महापालिका आयुक्तांचे आवाहन


 

■उत्सव मंडळांना महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक ; महापालिकेची मार्गदर्शक सूचना जारी

 

ठाणे , प्रतिनिधी  ;  कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदाचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा  करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ठाणेकरांनी देखील नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करून मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. याबाबत महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

 

   

            सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी उत्सव मंडळांना ठाणे महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यासाठीची ऑनलाईन परवानगी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून यावर्षी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सदर परवानगी विनाशुल्क देण्यात येणार आहे. 

 

   

           कोविड -१९ या साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता तसेच मा.उच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश आणि ठाणे महानगरपालिकेचे या संबंधीचे धोरण लक्षात घेता मर्यादित आकारमानाचेच मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिकरित्या स्थापन करण्यात येणाऱ्या देवीमुर्तीची सजावट आटोपशीर असावी. 



         तसेच देवीची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती मुर्तीकरिता २ फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीमूर्तीऐवजी घरातील धातू,संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. जेणेकरुन आगमन व  विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: चे तसेच कुटुंबियांचे कोविड -१९ साथरोगापासून संरक्षण करणे तसेच घरी विसर्जन करता येणे शक्य नसल्यास नजिकच्या नैसर्गिक विसर्जनस्थळी विसर्जन करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेच्यावतीने देण्यात आल्या आहेत. 

         

     

            घरगुती देवीमुर्तीचे आगमन व विसर्जन मिरवणूकीच्या स्वरुपाचे नसावे.  आगमनासाठी जास्तीत जास्त ५ व्यक्तींचा समूह असावा. जे उपस्थित असतील ते मास्क, शिल्ड इत्यादी स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत आणि सामाजिक अंतर पाळावे. तसेच शक्यतोवर या व्यक्तींनी कोविड -१९ या रोगाच्या लसीकरणचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत.



             सार्वजनिक देवीमूर्तीच्या आगमनाच्यावेळी व विसर्जनाच्यावेळी १० पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील त्यांनी मास्क , शिल्ड इ . स्वसंरक्षणाची साधने काटेकोररित्या वापरावीत आणि सामाजिक अंतर पाळावे. तसेच शक्यतो सदर १० व्यक्तींनी कोविड -१९ या रोगाच्या लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत. 

    

      

         नवरात्रौत्सवादरम्यान गरब्याचे आयोजन केले जावू नये. तसेच आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही व  कोविड -१९ च्या अनुषंगाने लॉकडाऊन शिथिल करण्यासंबंधीच्या शासनाच्या प्रचलित आदेशातील ( ब्रेक द चेन ) तरतुदींचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी यासोबतच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्याच्या सूचना महापालिकेच्यावतीने देण्यात आल्या आहेत. 

 

     

         गरबा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावे तसेच कोरोना, मलेरिया , डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. शक्यतो देवीमूर्तीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.



          देवी मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनींगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी सोशल डिस्टन्सींग  मास्कचा वापर, सॅनीटायझर इत्यादी स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे. मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसांतून तीन वेळा निर्जतुकीकरण करावे. तसेच कार्यकर्ते आणि इतर व्यक्ती यांना वापरासाठी सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे.

      

   

         नवरात्रौत्सव २०२१ साजरा करतेवेळी आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातींना पसंती देण्यात यावी. शक्यतो व्यावसायिक जाहिराती करु नयेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे, फुले व हार अर्पण करणे आदी बाबींस शक्यतो आळा घालावा. नवरात्रौत्सव मंडपाच्या परिसरात तसेच त्या लगतच्या रस्त्यांवर फुले , हार , प्रसाद आदी विक्रीसाठी स्टॉल, दुकाने लावू नयेत.

 

    

            कोरोना विषाणूची गंभीर आपत्ती लक्षात घेता गर्दी होवू नये म्हणून मंडप सजावट,रोषणाई तसेच देखावे करु नयेत. नवरात्रौत्सवादरम्यान धार्मिक , भक्तीपर आदी गर्दी जमा होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन टाळावे. मंडपात एका वेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहू नयेत याची खबरदारी घ्यावी.तसेच उपस्थित सर्व व्यक्तिंनी मास्क लावणे बंधनकारक आहे यासोबतच सामाजिक अंतर ठेवणे याचे काटेकोरपणे पालन होते आहे हे पाहण्याची जबाबदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची राहील. देवीच्या आरतीच्या वेळी मंडपात दहा पेक्षा जास्त कार्यकर्ते / भाविक उपस्थित असू नयेत, त्यांनी मास्क आणि सामाजिक अंतरासंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे .

 

      

           देवीच्या विसर्जनाच्या मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विसर्जन पार पाडणे आवश्यक राहील. लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिने विसर्जनस्थळी जाणे टाळावे . संपूर्ण चाळीतील , इमारतीतील सर्व घरगुती देवीमूर्तीचे एकत्रितरित्या विसर्जनास नेवून गर्दी करण्यास परवानगी असणार नाही

      

     

          सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्यंत धीम्या गतीने नेवू नये. तर वाहनातील देवीमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्य गतीने वाहन विसर्जन स्थळी घेवून जावे . विसर्जनादरम्यान वाहन थांबवून रस्त्यांवर भाविकांना देवीमूर्तीचे दर्शन घेवू देण्यास, पूजा करुन देण्यास सक्त मनाई आहे.



           नैसर्गिक विसर्जन स्थळी देवीमुर्तीचे विसर्जन करताना नागरिकांना थेट विसर्जन करता येणार नाही, विसर्जन स्थळी मुर्ती संकलनाची व्यवस्था संबंधित विभाग कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. नागरिकांनी तेथे मुर्त्या जमा कराव्यात व त्यांचे विसर्जन महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. 

     

  

             ठाणे महापालिकेच्यावतीने नैसर्गिक विसर्जन स्थळी प्रकाश योजना, जनरेटर, तात्पुरती स्वच्छतागृहे आदी आवश्यकतेनुसार दरवर्षी केली जाणारी व्यवस्था चोखपणे करण्यात येणार आहे. कोविड -१९ या साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने, महापालिकेने तसेच पोलीस प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक असून मास्क, सोशल संबंधीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. 



            नवरात्रौत्सवाच्या विसर्जनाच्या तारखेस जर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर हा कंटेनमेंट झोनमध्ये असेल तर त्या सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळास मंडपातच लोखंडी टाकी ठेवून किंवा तत्सम व्यवस्था करुन मुर्तीचे विसर्जन करणे बंधनकारक राहणार आहे. 

यंदाचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापौर व महापालिका आयुक्तांचे आवाहन यंदाचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापौर व महापालिका आयुक्तांचे आवाहन Reviewed by News1 Marathi on October 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads