शटडाऊनचा कालावधी कमी करून जलवाहिनी दुरुस्ती, रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करा : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

 

■दिवा, मुंब्रा व कळवा परिसरातील विविध कामांचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला आढावा..


ठाणे , प्रतिनिधी  : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनचा कालावधी कमी करून एमआयडीसी व महापालिका प्रशासनाने समन्वय साधून येत्या मार्च अखेर दुरुस्ती व रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.        दरम्यान दिवा-मुंब्रा परिसरात सुरू असलेल्या विविध कामांचा आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेवून ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत तसेच दर आठवड्यानी झालेल्या कामाचा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.          ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, क्रीडा व समाजकल्याण सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या सभापती कु. प्रियांका पाटील, दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षा सौ. सुनिता मुंडे, माजी उपमहापौर तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक उमेश पाटील, राजेंद्र साप्ते, शैलेश पाटील, अमर पाटील, दिपक जाधव, नगरसेविका दर्शना म्हात्रे, पूजा करसुळे, अंकिता पाटील, दीपाली भगत, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, नगरअभियंता अर्जुन अहिरे, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच महापालिकेचे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.         महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु टप्याटप्याने सुरु आहे. यासाठी घेण्यात येणाऱ्या नियोजित शटडाऊन नंतर वारंवार ब्रेक डाऊन झाल्यामुळे दिवा परिसरात अनियमीत पाणी पुरवठा होत आहे. याबाबत आज खासदार डॉ. शिंदे यांनी एमआयडीसीचे व महापालिका प्रशासन यांची समवेत बैठक घेवून संपूर्ण कामाचा आढावा घेतला.        यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जलवाहिनी दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनचा कालावधी कमी करून दोन्ही विभागाने समन्वय साधून विविध ठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेल्या पाईपलाईन दुरुस्तीची सर्व कामे येत्या मार्च अखेर काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.         या बैठकीमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवा विभागातील इतर विविध कामांचा आढावा घेतला. यामध्ये दिवा-मुंब्रा रस्त्याचा डी.पी.आर तयार करणे, बांधून तयार असलेले जलकुंभ कार्यान्वित करणे आदी कामे तात्काळ करणेबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.           तसेच दिवा-शिळ रोड, दिवा-आगासन रोड, दिवा बायपास, दातिवली रस्ता, साबे रोड,रेल्वे ओव्हर ब्रीज आदी रस्त्यांची कामे जलदगतीने व्हावीत या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देशही खासदार डॉ. शिंदे यांनी दिले. तसेच या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.         शहरातील दिवा परिसर महत्वाचा भाग असून या विभागाच्या सर्वांगीण विकासाबाबत सदर बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली व सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे मंजूर असणाऱ्या क्षमतेचा रीतसर पाणीपुरवठा ठाणे महापालिकेस करण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

Post a Comment

0 Comments