मोबाईल टॉवर वीज चोरी प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीने बजावली कारणे द्या नोटीस


■महावितरण तर्फे पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे गुन्हा दाखल...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   : कल्याण पश्चिमेच्या एपीएमसी मार्केटमधील इमारतीच्या छतावर असलेल्या एअरटेल  कंपनीच्या मोबाईल टॉवरसाठी फिडर पिलरमधून थेट वीजचोरी होत असल्याची घटना उघडकीस आली होती. गेल्या सहा महिन्यांत या टॉवरसाठी 8 लाख 19 हजार रुपये किंमतीची तब्बल 56 हजार 150 युनिट वीज चोरून वापरल्याबद्दल मे. सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध महावितरणने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या बाबत कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित मोबाइल कंपनींना कारणे द्या नोटीस बजावली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कपिल थळे यांनी दिली.



वीजचोरी शोध मोहिमेत महावितरणच्या पथकाने ८ ऑक्टोबर रोजी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील सी टाइप इमारतीच्या छतावरील मोबाईल टॉवरच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. त्यामध्ये याठिकाणी अधिकृत वीजजोडणी न घेता विनामीटर थेट वीजवापर होत असल्याचे आढळले. या मोबाईल टॉवरसाठी काळ्या रंगाची ४० मीटर केबल वापरून महावितरणबाबफिडर पिलरमधून थेट आणि अनधिकृतपणे वीजचोरी केल्याचे तपासणीतून उघड झाल्याचे पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. 



तर १८ मे पासून वीजचोरीचा हा प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले असून त्यानुसार वीजचोरीचे देयक आणि दंड भरण्याबाबत सुयोग टेलेमॅटिक्सला नोटीस बजावण्यात आली. परंतु संबंधित रकमेचा भरणा न झाल्याने सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध सहायक अभियंता खान यांनी फिर्याद दिली.  या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी वीज कायदा २००३ च्या कलम १३५  नुसार सुयोग टेलेमॅटिक्स विरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.



मे. सुयोग टेलेमॅटिक्स या कंपनीला मोबाईल टॉवर बसविण्याची परवानगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आली होती. हि परवानगी देतांना विद्युत मीटर घेण्याची जवाबदारी संबंधित कंपनीला देण्यात आली होती. मात्र त्यांनी तसे न करता डायरेक्ट वीज पुरवठा केला. हि बाब महावितरणच्या लक्षात येताच महावितरणने संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल केला. हि बाब आम्हाला समजताच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित मोबाइल कंपनींला कारणे द्या नोटीस बजावली असून त्यांच्या उत्तरानंतर योग्य कारवाई करणार असल्याचे सभापती कपिल थळे यांनी सांगतिले.

Post a Comment

0 Comments