सामाजिक बांधिलकीचे नाते जपणारे राजेश जाधव यांच्या 'आधारवड' या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
ठाणे , प्रतिनिधी  : गेली २१ वर्षे सामाजिक बांधिलकीचे नाते जपणारे ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांनी समाजकार्यात एक पाऊल पुढे टाकत विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर 'आधारवड' या जनसंपर्क कार्यालयाची स्थापना केली. ठाणे शहर आमदार माननीय श्री. संजय केळकर, ज्येष्ठ साहित्यीक श्री. दाजीशास्त्री पणशीकर, स्थानिक नगरसेवक श्री. मनोहर डुंबरे व सुप्रसिद्ध चित्रकार श्री. विजयराज बोधनकर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास अनेक मान्यवर, ब्रह्मांड कट्टा परिवाराचे सदस्य तसेच अन्य शुभचिंतक उपस्थित होते. ब्रह्मांड कट्टा परिवारातील सदस्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने सोहळ्यास रंगत आणली.              ब्रह्मांड कट्टा सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असून कोरोनाकाळातही कट्टयाने रसिकांचे अविरत मनोरंजन तथा प्रबोधन केले.  या कार्यालयाद्वारे जनतेला समस्या समाधानासाठी एक हक्काचे स्थान मिळाले असून आधारवड  कायम सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवत राहिल असे प्रतिपादन  ब्रह्मांड कट्टा परिवाराला एकजुटीने बांधुन ठेवणा-या जाधव यांनी केले. तसेच बंधुत्व व मानवतेची कास धरुन ब्रह्मांड परिसराचा सर्वांगीण विकास हे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.            सध्या ब्रह्मांड कट्टा अंतर्गत कलासंस्कार, ब्रह्मांड संगीत कट्टा, ब्रह्मांड मॉर्निंग इव्हनिंग वॉकर्स क्लब, वाचक कट्टा, महिला बचत गट अशा संस्था यशस्वीरित्या कार्यरत असून 'आधारवड' कार्यालय हे या सर्व संस्थांचे तसेच जनतेचे भक्कम आधारस्तंभ होईल यात शंका नाही.

Post a Comment

0 Comments