कल्याण डोंबिवलीत बिल्डरचा असाही आदर्श डीपी रस्त्याच्या आड येणारी बेकायदा इमारत बिल्डरने स्वत :हून पाडली
कल्याण, कुणाल  म्हात्रे  : दावडी परिसरातील डीपी रस्त्याच्या आड येणारी दोन मजली बेकायदा इमारत बिल्डर व जागा मालकाने स्वत: हून पाडली आहे. जागा मालक व बिल्डरने उचललेले पाऊल हे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या इतर बिल्डरांसाठी आदर्श असल्याचे बोलण्यात येत आहे. तर वास्तुविशारद संदीप पाटील यांनी या जागा मालक आणि बिल्डरचे कौतुक करत त्यांच्या अधिकृत इमारतीचा प्लान पास मोफत करणार असल्याचे सांगितले.  कल्याण डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे सुरु केली आहेत. मात्र महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पास गालबोट लावले जात आहे. डीपी रस्त्याच्या आड बेकायदा इमारती उभारल्या जात आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ३०० अशा इमारती आहेत. या प्रकरणी वास्तू विशारद संदीप पाटील यांनी आवाज उठविला आहे. दावडीतील डीपी रस्त्याच्या आड येणा:या इमारतीच्या विरोधात पाटील यांनी आवाज उठविला होता. त्यानुसार दावडी परिसरातील दोन इमारती पालिका प्रशासनाने निष्कासित देखील केल्या.या पाश्र्वभूमीवर दावडी येथील जागा मालक दत्ता पाटील आणि नितीन म्हात्रे यांच्या जागेत बिल्डर जितेंद्र ठाकूर आणि भास्कर पाटील यांनी २४ मीटर डीपी रस्त्यात दोन मजली इमारतीचे बांधकाम केले होते. मात्र आपली इमारत डीपी रस्त्यात येत असल्याने शहराच्या विकासाला आपल्यामुळे अडथळा  निर्माण होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाल्याने त्यांनी हि इमारत स्वताःहून पाडत अनधिकृत बांधकाम करणाऱ्या इतर बिल्डरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.दरम्यान अशा प्रकारे पुढाकार घेऊन स्वत:च पाडकाम करणा:या जागा मालक व बिल्डरांच्या निर्णयाचे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी स्वागत केले असून  अधिकृत इमारत बांधकामाचा प्लान महापालिकेकडे मंजूरीसाठी टाकावा. त्याच्या इमारतीचा आराखडा मोफत तयार करुन दिला जाईल असे संदीप पाटील यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments