सिरोसर्व्हिलन्स तपासणीसाठी महापौर नरेश म्हस्के यांचा पुढाकार

 

■आरोग्यकेंद्रात येणाऱ्या नागरिकांनी सिरोसर्व्हिलयनसाठी प्रतिसाद द्यावा महापौर नरेश म्हस्के व डॉ. विपिन शर्मा यांचे आवाहन..


ठाणे , प्रतिनिधी  : कोविड 19 च्या तिसऱ्या लाटेचे नियोजन करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका हद्दीतील कोविड होवून गेलेल्या व लसीकरण झालेल्या विविध वयोगटातील नागरिकांमध्ये प्रतिपिंडे (अॅण्टीबॉडीज) तयार झाली आहेत की नाहीत याची प्रातिनिधीक स्वरुपात तपासणी करण्याचा ठाणे महापालिकेने सिरोसर्व्हिलन्स सर्व्हेचे काम सुरू केले आहे.       या सिरो सर्व्हिलयन उपक्रमाची सुरूवात आज महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी महापौरांनी स्वत:  सिरो सर्व्हिलयनची तपासणी करुन नागरिकांमध्ये या तपासणीबाबत विश्वास निर्माण केला असून नागरिकांनी या उपक्रमास आरोग्यकेंद्रात येणाऱ्या नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.          ठाणे महापालिकेच्या कोपरी आरोग्य केंद्र येथे या सिरोसर्व्हिलन्स मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, उपायुक्त मनिष जोशी, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, माजी नगरसेवक गिरीष राजे आदी उपस्थित होते.         कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नागरिक बाधित झाले तर काहींना जीव गमवावे लागले. कोविड 19 चा विषाणू एका व्यक्तीला पुन्हा पुन्हा बाधित करीत असल्याचे तसेच  कोविड 19 च्या लसीकरणानंतरही या विषाणूची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.  कोविड 19 विषाणूची व त्या विषाणूमुळे मानवी शरीरात होणाऱ्या परिणामांची पूर्णत: उकल झालेली नाही. कोविड 19 बाधित जनसमुदायामध्ये कोविड 19 ची प्रतिपिंडे निर्माण होत असतात.           या प्रतिजैविकांमुळे काही प्रमाणात कोविड 19 च्या आजारापासून संरक्षण मिळते असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. तसेच लसीकरणानंतरही ही प्रतिपिंडे कोविड 19 या आजारापासून संरक्षण देतात. महापालिका हद्दीत नागरिकांमध्ये अशा प्रकारची प्रतिपिंडे (अॅण्टीबॉडीज) तयार झाली आहेत का? त्याचे प्रमाण किती आहे? किती नागरिकांपर्यत लसीकरणानंतर प्रतिपिंडे तयार झाली आहेत आदीची तपासणी करण्याचा कार्यक्रम सिरोसर्व्हिन्स माध्यमातून सुरू करण्यात आला असून या अहवालानुसार तिसऱ्या लाटेवर पूर्ण मात करण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करणे सोईचे होईल असे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.        सदरचा सर्व्हे हा संपूर्ण महापालिका क्षेत्रात होणार असून हा सर्व्हे लोकसंख्येवर आधारित आहे, त्यामुळे ठाण्यात अंदाजे 800 ते 900 नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी प्रभागसमितीनिहाय संबंधित आरोग्यकेंद्रात जे नागरिक तपासणीसाठी येतात, त्या नागरिकांची समंती घेवूनच  त्यांची सर्व माहिती ॲपवर नोंदणी केली जाईल. त्यानंतर त्या नागरिकांचे रक्ताचे नमुने घेवून प्रतिपिंडेची चाचणी होणार आहे, ही माहिती पूर्णत: गोपनीय ठेवली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी नमूद केले.     तरी आरोग्य केंद्रात येणाऱ्या  नागरिकांनी या तपासणीसाठी घाबरुन न जाता महापालिकेच्या उपक्रमास  सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments