सेवा सप्ताहा निमित्त लायन्स क्लब ऑफ मोहने टिटवाळाच्या वतीने विविध सामजिक उपक्रम

कल्याण , प्रतिनिधी  : लायन्स क्लब ऑफ मोहने टिटवाळाच्या वतीने गांधी जयंतीपासून सेवा सप्ताहानिमित्त मोहने टिटवाळा या अविकसित भागात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच सेवा सप्ताहाचा एक भाग म्हणून आज नागरिकांच्या डोळे तपासणी शिबिराचे आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लायन्स क्लबचे रिजन चेअरपर्सन प्रफुल कोठारी, लायन्स क्लब ऑफ मोहने टिटवाळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक दयाशंकर शेट्टी, सचिव राहुल मिश्रा, कोषाध्यक्ष रमेश कोनकर,उपाध्यक्षा माया कटारिया, रॅली समन्वयक व उपसचिव डॉ. अभिलाषा सिंग आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 


  

       लायन्स क्लब ऑफ मोहने टिटवाळाच्या मार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मोहने टिटवाळा या अविकसित भागात तळागाळातील, गरजू, गरीब नागरिकांसाठी वर्षभर विविध समाजउपयोगी कार्यक्रम राबविले जातात. २ ऑक्टोंबर गांधी जयंती पासून ९ ऑक्टोंबर पर्यंत आयोजित केलेल्या या सेवा सप्ताहामध्ये दंतचिकित्सा शिबीर, सरकारी कार्यालयांमध्ये प्रथमोपचार कीट वाटप, मोहने पोलीस चौकीचे नूतनीकरण, भुकेल्यांसाठी अन्नवाटप, जेष्ठ नागरिकांना डायपर आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, किन्नरांसाठी आधारकार्ड पॅनकार्ड शिबिरासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, अर्पण रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, डोळे तपासणी शिबीर आदी कार्यक्रम संपन्न झाले आहेत.
तर गुरुवारी मोहने येथील सिद्धार्थ शाळेत शालेय पुस्तकांसह वाचनालय सुविधा, शालेय मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शुक्रवारी टिटवाळा येथे मधुमेह जनजागृती रॅली तसेच मोफत रक्तशर्करा चाचणी आणि मधुमेहावर अनघा गांधी यांचे मार्गदर्शन शिबीर पार पडणार आहे. दरम्यान ऑक्टोंबर सेवा सप्ताहाच्या माध्यमातून लायन्स क्लब ऑफ मोहने टिटवाळाच्या वतीने तळागाळातील गोर गरीब नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असून, सेवा सप्ताहासोबतच वर्षभर देखील विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. तसेच लायन्स क्लब ऑफ मोहने टिटवाळाच्या वतीने मोहने येथील विराट क्लासिक बिल्डींगमधील महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर पार्टीशीयन, टेबल, खुर्च्या, मंडप, वॉटर प्युरीफायर आदी सुविधा दिल्या असल्याची माहिती दयाशंकर शेट्टी यांनी दिली.       

Post a Comment

0 Comments