शाळेच्या मालकी वादातून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न शाळेच्या कर्मचाऱ्यानेच दिली हल्ल्याची सुपारी दोन आरोपी गजाआड, फरार हल्ले खोरांचा शोध सुरु
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  शाळेच्या मालकीच्या वादातून संस्थाचालकामध्ये वाद सुरू होता .हा वाद इतक्या विकोपाला गेला की या वादातून चक्क सुपारी दिली गेली. संस्थेच्या पदाधिकार्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस तपासात शाळेच्या कर्मचाऱ्याने ही सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी दोन आरोपींना बेडय़ा ठोकल्या आहेत. या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरात साई इंग्लीश स्कूल ही नामांकीत शाळा आहे. या शाळेच्या मालकी हक्कावरुन शाळेचे प्रशासक गिरी सोमयाजुला यांचा काही सदस्यांसोबत वाद सुरु आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. १४ ऑक्टोबर रोजी गिरी आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत स्वत:च्या गाडीने  कल्याण पश्चिमेतून कल्याण पूर्व भागातील शाळेकडे निघाले होते. एका ठिकाणी रस्त्यावर काही अज्ञात इसमानी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. या अज्ञात इसमाचा हातात रॉड आणि कोयता होता. हे अज्ञात तरुण आपल्यावर हल्ला करण्याचा तयारीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.स्कूटी चालकाने त्याची स्कूटी गिरी यांच्या गाडीसमोर आणून उभी केली. गिरी यांनी गाडी न  थांबविता स्कूटी फरफटत नेले. त्याच्यामागे चार ते पाच हल्लेखोर होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत कल्याणच्या खडकापाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मागदर्शनाखाली खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार आणि  पोलीस निरीक्षक शरद झीने  यांनी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहय्याने या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसानी या प्रकरणी दोन आरोपींना बेडय़ा ठोकल्या आहेत. जयेश अंकूश आणि राहूल खुळे अशी दोन आरोपींची नावे आहेत. धक्कादायक म्हणजे जयेश हा साई स्कूल शाळेत काम करतो. आरोपी जयेशने गिरी यांच्यावर हल्ला करण्यासाठी हल्लेखोरांना १ लाखाची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले आहे. फरार हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणात जयेश, अंकुशसह आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास  पोलीस घेत आहेत.

Post a Comment

0 Comments