१७६ देशांतील भारतीयांची डोंबिवली मेड फराळाला पसंती महागाईसह आर्थिक मंदीमुळे विक्रीवर परिणाम

 
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवलीत पुरण-पोळी, उकडीच्या मोदकांसह दिवाळीच्या तयार फराळालाही मोठ्या प्रमाणावर खप असतो. घटस्थापनेपासून दिवाळीपर्यंतचा काळ सर्वाधिक खरेदीचा असतो. त्यातच सद्या कोरोना महामारीचे संकट काहीसे कमी झाले.            त्यामुळे विदेशातील 176 देशांत राहणाऱ्या भारतीयांनी डोंबिवलीमेड दिवाळीच्या फराळाला प्रथम पसंती दिली आहे. तथापी महागाईसह आर्थिक मंदीचा फटका घरगुती तयार फराळाला देखिल बसला आहे. त्यामुळे दिवाळी फराळाच्या विक्रीत घट होण्याची भीती विक्रेते व्यक्त करत आहेत.       दसरा संपला की कल्याण-डोंबिवलीतून परदेशी फराळ पाठवण्याची लगबग सुरू होते. मात्र गेल्यावर्षी या व्यवसायलाही कोरोनामुळे, तर यंदाच्या दिवाळीत महागाईमुळे फटका बसल्याचे विक्रेते सांगतात. एकूणच यंदाच्या दिवाळीपूर्वीच बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली आहे. कल्याण-डोंबिवली भाजी-पोळी विक्री करणारी जवळपास 350 केंद्र आहेत. या ठिकाणी घरगुती पद्धतीचा दिवाळी फराळ पण मोठ्या प्रमाणात विकला जातो.       दिवाळीचा फराळ 176 देश-परदेशातील विविध प्रमुख शहरांत पाठवण्याची सोय करण्यात आली असल्याचे सुरस फुडसचे सुनील शेवडे सांगतात. ते म्हणाले, यंदाही फॅमिली हॅम्परची 6 आणि 8 किलो फराळ पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या दिवाळीप्रमाणे अमेरिका, लंडन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युके, दुबई, कॅनडा, हॉंगकॉंग, मलेशिया, ओमान, कतार, आदी 176 देशांत घरगुती पद्धतीचा तयार फराळ पाठवण्यात येत आहे.       दिवाळी फराळात विविध प्रकारच्या चकल्या, चिवडा, शेव, कडबोळी, वेफर्स, शंकरपाळे, आंबाबर्फी, गूळबुंदी लाडू, बेसन लाडू, करंज्या, अनारसे, चिरोटे, फरसाण, कंदील, पणत्या, साबण, कॅलेंडर आणि रांगोळीचे स्टिकर असा फॅमिली हॅम्परमध्ये समावेश असल्याचे शेवडे म्हणाले. कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्याने हवाई वाहतूक सेवा सुरु करण्यात आली आहे.        मात्र शिपिंग कंपन्यांची जहाजामधून पूर्वी 5 टन फराळ परदेशात जायचा. मात्र हवाई वाहतूकमध्ये पार्सल कमी प्रमाणात जाते. त्यामुळे त्याचाही परिमाण झाला असून विदेशात राहणाऱ्या ग्राहकांना किमान दिवाळीपूर्वी त्यांचे फराळाचे पार्सल पोच व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे शेवडे यांनी सांगितले.       सद्या बाजाराची अवस्था लक्षात घेऊन विक्रेत्यांनी 40  ते 45 टक्के माल खरेदी करण्यामध्ये कपात केली आहे. त्यामुळे येत्या दिवाळी सणात तयार फराळ खरेदीला महागाईमुळे फटका बसणार असल्याचे दिसून येते. नवरात्रीपर्यंत फराळाच्या ऑर्डर यायला लागलेल्या असतात. ऑर्डरनुसार तेल, इतर किराणा सामानाची खरेदी केली जाते.       मात्र गेल्या  वर्षी कोरोनामुळे घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे 6 महिने सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. त्यांनतर बाजारपेठ हळूहळू आर्थिक व्यवहारातून सावरत असतानाच आता खाद्यतेलासह दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या वस्तूही महागल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिमाण थेट यंदाच्या दिवाळीत पाहवयास मिळत आहे.  
   


        पूर्वी दिवाळीचा फराळ हा सण संपल्यानंतरही आवडीने खाल्ला जायचा. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. लोकांची चव बदलली आहे. त्यामुळे मिठाई, चॉकलेट, ड्रायफ्रुट अशा इतर पदार्थांचाही पर्याय पुढे आला. पूर्वी मोठ्या प्रमाणात होणारा फराळाचा खप यंदा मंदावला आहे. फिटनेसचे कारण देत अनेक जण तेलकट, तुपकट पदार्थ, लाडू खात नाहीत.         चार वर्षांपूर्वी दुकानांतल्या रेडिमेड फराळावर 12 टक्के जीएसटी आकारला जात होता. त्यामुळे किमती प्रतिकिलो 50 ते 60 रुपयांनी वाढल्या. बचत गटांच्या माध्यमातून तयार झालेल्या पदार्थांवर हा करभार नसल्याने या पदार्थांना मागणी अधिक होती. यावर्षी मात्र महिला बचत गटांना मिळणाऱ्या ऑर्डरचे प्रमाण महागाईमुळे खूपच कमी झाले आहे.        दिवाळी तोंडावर आली की घरोघरी साफ-सफाईसह खरेदीची लगबग सुरू होते. यात दिवाळीच्या फराळाला मानाचे स्थान असते. घर आणि करिअर अशा दोन्ही आघाड्यांवर लढणाऱ्या अनेक महिलांना फराळ करण्याचा खटाटोप करता येत नाही. महिला बचत गट हे सामाजिक आर्थिक उपक्रम आहेत. महाराष्ट्रात बचत गटांच्या माध्यमातून महिला आणि छोटे व्यवसायिक यांची जणू एक चळवळच उभी राहिली.        कपडे, गोधड्या, घरगुती लोणची-पापड विक्री, ऑफिस फाईल्स, उदबत्त्या, आदी अनेक प्रकारचे उद्योग महिला बचत गटांच्या माध्यमातून केले जातात. सणासुदीच्या दिवसांमध्ये नोकरदार महिलांना मदतीचा हात देण्यासाठी दिवाळी पदार्थांच्या ऑर्डरही महिला बचत गट घेतात.         तथापी गेल्या दिवाळीसह वर्षभरातील सर्वच सण कोरोना काळात आल्याने यंदाच्या दिवाळी फराळाला महागाई आणि  बाजारातील मंदीमुळे मोठ्या प्रमाणात मागणी नसल्याचे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments