ठाणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी पदी श्री.अविनाश फडतरे यांची नियुक्ती

 ठाणे दि.७ ( जि. प) : ठाणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी पदी श्री.अविनाश फडतरे यांची नियुक्ती झाली आहे. आज त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.            मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील असणारे श्री.अविनाश फडतरे यांनी २०१० साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होत शासकीय सेवेत प्रवेश केला. परिविक्षाधीन कालावधीत त्यांनी वाशीम जिल्हा परिषदेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर २०११ ते २०१४ या कालावधीत पाटण तालुक्याचे गट विकास अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर २०१८ पर्यँत कराड तालुक्याच्या गट विकास अधिकारी पदाची धुरा त्यांनी सांभाळली.            त्यांच्या या कार्यकाळात कराड तालुक्याला राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या यशवंत पंचायत राज पुरस्काराच्या व्दितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. २०१८ ते ऑक्टोबर २०२१ पर्यँत  सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली. या कार्यकाळात पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी समर्थपणे सांभाळत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये सातारा जिल्हाला देशात प्रथम क्रमांक मिळवून देण्यातही त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.                त्याच बरोबर केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण पुरस्कारावरही सातारा जिल्हा परिषदने सगळं दोन वर्ष नाव कोरले. हा पुरस्कार मिळण्यातही श्री.फडतरे यांनी मोलाची भूमिका बजावली. येथे कार्यरत असतानाच त्यांच्याकडे ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक पदाचीही जबाबदारी देण्यात आली होती. कोरोना महामारीत त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला 'मानिनी मास्क' ब्रँड राज्यभर गौरविला गेला. तसेच कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे  जिल्हा प्रशासनाने त्यांचा सन्मान केला होता.            त्याचबरोबर ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना ग्रामपंचायत स्तरावर बांधकाम परवानगीमध्ये सुसूत्रता, अतिक्रमणे नियमित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ग्रामपंचायत विकास आराखडा, जनसुविधांची कामे, स्वामित्व योजना, १५ वा वित्त आयोग निधीचा विनियोग, १४ वा वित्त आयोगाच्या निधीतून सुसज्ज रुग्णवाहिका खरेदी करून त्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राना वाटप करण्यात त्यांची सकारात्मक भूमिका राहिली होती.           शेतकरी कुटुंब आणि दुष्काळी गावातला जन्म असल्याने शेती-मातीची त्यांची घट्ट नाळ बांधली गेली आहे. शेती हा त्यांचा जिवलग विषय असून शिक्षणही एम.एस. सी.ऍग्रीतून झाले आहे. गेल्या दहा वर्षात श्री.अविनाश फडतरे यांनी शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजना, उपक्रम, अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करून  प्रशासनात नाममुद्रा उमटवली आहे. जलदगतिने कामाचा निपटारा करून सामान्य नागरिकांचे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. 

 


■ लोकाभिमुख प्रशासन अशी प्रतिमा बनविण्याचा प्रयत्न         ठाणे जिल्हा परिषद ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या अगदी जवळची जिल्हा परिषद आहे. त्यामुळे इथे सामान्य प्रशासन विभागात विभागप्रमुख म्हणून काम करताना नक्कीच मोठी जबाबदारी आणि आव्हाने आहेत. परंतू मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख प्रशासन अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न राहील. असेच तंत्रज्ञानावर भर देऊन प्रशासन तंत्रस्नेही करण्यावरही भर राहील असे श्री.अविनाश फडतरे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments