अभिनय कट्ट्याच्या वाचक कट्ट्यावर अशक्यही शक्य करतील स्वामी यामिनी पानगावकर

ठाणे, प्रतिनिधी  :  सुमारे दिड ते दोन वर्षांनंतर अभिनय कट्ट्यावरील वाचक कट्ट्याची सुरुवात सद्गुरू श्री स्वामी समर्थ संदर्भात विविध पुस्तकांतील भागांचे वाचन करून करण्यात आली. वाचक कट्ट्याचे दीप प्रज्वलन लेखिका यामिनी पानगावकर तसेच अतुल धायडे यांच्या हस्ते  करण्यात आले. तसेच अनंत मुळे, शुभांगी भालेकर व संचालक किरण नाकती यांनी सुध्दा त्यात सहभाग घेतला. वाचक कट्ट्याची सुरुवात श्री स्वामी समर्थ बावनीचे वाचन करीत संध्या नाकती यांनी केली. 


          उपस्थित साहित्य प्रेमी सुध्दा या बावनीच्या वाचनात अगदी समरस झाले व संपूर्ण वाचक कट्ट्याचे वातावरण प्रसन्न झाले. किरण नाकती यांच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या लेखकांचे साहित्य सभोवताली  मांडून सोबत नटराजची मूर्ती व पुष्पहारांचा मालिकेने सजवून अतिशय  कल्पक अश्या नेपथ्याची मांडणी करण्यात आली होती. श्री गुरुलीलामृत कथासारचे वाचन शुभांगी भालेकर, राजन मायेकर, तृप्ती भगत, अपर्णा वाडदेकर यांनी केले. श्री स्वामी समर्थांच्या अगाध लिला कथारूपी ऐकायला मिळाल्याने उपस्थित प्रेक्षकांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले. 


         या वाचक कट्ट्याचे निवेदन राजन मायेकर यांनी केले. लेखिका यामिनी पानगावकर यांनी वाचक कट्ट्याची पुन्हा एकदा सुरुवात होत असल्याने आनंद व्यक्त केला. किरण नाकती यांनी मागील संपूर्ण कोरोना काळात जिवाची बाजी लावून केलेल्या लोकसेवेचे भरभरून कौतुक करीत वाचक कट्ट्याला शुभेच्छा दिल्या व पुढच्या वाचक कट्ट्यावर विविध विषय देऊन वाचन करण्याचे मार्गदर्शन केले . 


        पोलिस अधिकारी व लेखक अतुल धायडे यांनी कसाब च्या हल्ल्याप्रसंगी ते स्वतः कर्तव्यावर असतानाचा तो प्रसंग वर्णन केला तेव्हा उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर काटा आला . वाचक कट्ट्यावर विविध अभिनव प्रयोग करून वाचन संस्कृती जतन करण्याचे कार्य अभिनय कट्ट्याचा हा वाचक कट्टा करणार आहे असे मत किरण नाकती यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments