भिवंडीत चायनीज गाडीवरील गल्ला पळविण्याच्या वादातून तरुणाची भर रस्त्यात हत्या; मालकासह ५ जण गजाआड

 



भिवंडी दि 26 (प्रतिनिधी ) एका चायनीज गाडीवरील पैश्याचा गल्ला पळविण्याच्या वादातून चायनीज गाडीच्या मालकासह ५ जणांच्या टोळक्याने ३२ वर्षीय तरुणाची भररस्त्यात हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना  भिवंडी शहरातील वंजारपट्टी  नाका परिसरातील  मेट्रो हॉटेल जवळ असलेल्या चायनीसच्या  गाडीवर घडली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून ५ जणांना अटक केली आहे. 

 


आरोपीमध्ये तिघा बाप लेकांचा सहभाग.. 


          अफजल नूरमोहम्मद सिद्धीकी (वय २७) अफसर नूरमोहम्मद सिद्धीकी (वय २६) मो. बशीर अन्सारी (वय २८) नूर मोहम्मद मकदूमबक्ष सिद्धीकी उर्फ पुरीभाजीवाला उस्ताद (वय,६४) असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 



विशेष म्हणजे  आरोपीमध्ये तिघा बाप लेकांचा सहभाग असून तिघेही भिवंडीतील नदीनाका भागात राहणारे असून आरोपीमध्ये  एक साडे चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तर शफिक महबूब शेख( ३२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो भिवंडीतील म्हाडा कॉलोनी परिसरात राहत होता. 

 

रस्त्यावरच पकडून  लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण.. 


        आरोपी  अफजल नूर मोहम्मद याचे मेट्रो हॉटेल जवळ असलेल्या अबूजी बिल्डिंग समोर चायनीजची गाडी आहे. या गाडीवर सोमवारी सव्वा अकराच्या सुमारास मृतक शफिक हा आला होता. त्यावेळी त्याने चायनीज गाडीवरील काम करणाऱ्या कारागिराशी वाद घातला. त्यांनतर गाडीवरील पैश्याचा  गल्ला पळविला असता, पाचही आरोपींनी मृत शफिकला रस्त्यावरच पकडून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. 

 

हत्येमुळे परिसरात तणाव .. 


            मारहाणीनंतर शफिकला भिवंडीतील  इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे मृतक  शफिकच्या नातेवाईकांनी घटनस्थळी एकच गोंधळ घातला होता.  या मारहाणीत शफिकचा मृत्यू  झाल्याचे समजताच परिसरात एकच तणाव निर्माण झाला होता. मात्र  पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून निजामपूर पोलिसांनी पंचनामा करीत हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आज पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास पाचही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.  

 

शहरात ५०० हुन अधिक चायनीज विक्रेते .. 

 

भिवंडी शहर यंत्रमाग नगरी असल्याने शहरातील विविध भागात हजारो यंत्रमाग यंत्रांची धडधड २४ तास सुरूच असते, त्यामुळे कामगारांसाठी उशिरा पहाटेपर्यत बहुतांश भागात हॉटेल व खाद्यपदार्थाच्या हातगाड्या सुरु ठेवल्या जातात. 


विशेष म्हणजे भिवंडी शहरातील विविध भागात सुमारे ५०० हुन अधिक बेकायदा चायनीज सेंटर व हातगाड्या असल्याने अश्या या सेंटर आणि हातगाडीवर नेहमीच शुल्लक कारणावरून वाद होऊन हाणामारीचे प्रकार घडत असतात. त्यामुळे अश्या बेकायदा चायनीज विक्री करणाऱ्यावर कारवाईची मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.  

Post a Comment

0 Comments