सेंच्युरी रेयोनच्या वतीने कुष्ठरोग रूग्णांसाठी नेत्र तपासणी व चष्मे वाटप
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कुष्ठरोग सेवा संस्था हनुमान नगरकल्याण येथे रविवारी सेंच्युरी रेयोन सी.एस.आर.सेवा अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ६९ कुष्ठरोग रुग्णांनी नेत्र चिकित्सक डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करून घेतली. तपासणी नंतर डोळ्यांचे अचूक नंबर काढून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. तर काहींना डोळ्यांचे इतर गंभीर आजार आढळून आले त्यांना नजीकच्या सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला.सर्वत्र विविध प्रकारची अनेक आरोग्य शिबिरे संपन्न होत असतात परंतु अशा शिबिर सेवांपासून हे रुग्ण नेहमी वंचित राहतात. शिवाय कुष्ठ रोगाच्या दीर्घकालीन उपचाराने या रुग्णांवर विपरीत परिणाम होऊन डोळ्यांचे आजार निर्माण होण्याची शक्यता जास्त असते म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सी.एस.आर चे प्रमुख अधिकारी यांनी उदघाटन करते वेळी सांगितले. यावेळी सी.एस.आर.चे इतर सदस्य, ठाणे विभाग वैद्यकीय अधिकारी डॉ.दहिफळे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ गिता काकडे, कुष्ठरोग तंत्रज्ञ मंगेश खंडारे, कुष्ठरोग सेवा समिती संस्थेचे अध्यक्ष अजय कोठारे, उपाध्यक्ष चंद्रकांत कोठारे, शेख मुजावर, सचिव संतोष वाघमारे खजिनदार, श्रीकांत कोटुरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.दरम्यान कुष्ठरोग रुग्णांना इलाज करण्यासाठी महत्त्वाची असणारी ऑटोक्लेव्ह मशीन जी मलम आणि पट्ट्या यांचे निर्जंतुकीकरण करते ती मशीन नेहमीच्या सेवेसाठी दान देऊन शिबिराची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments