ठाणे महापालिकेचा ३९ वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा ठाण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल असे प्रकल्प राबविले जाणार : महापौर नरेश म्हस्के
ठाणे  , प्रतिनिधी  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ठाणे महापालिकेचा ३९ वा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला. आज सकाळी ७.३० वाजता महापालिका भवन येथे महापौर नरेश गणपत म्हस्के यांचे हस्ते महापालिका ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना अग्निशमन दल व सुरक्षा दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली.  यावेळी शहरात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे करण्यात आली असून ठाण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल असे प्रकल्प यापुढेही राबविले जाणार असल्याचे प्रतिपादन महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी केले.


 

            तदनंतर महापालिका भवन येथील कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पूजनीय नेत्यांच्या प्रतिमांना व शहरातील पूजनीय नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उप महापौर सौ. पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, सांस्कृतिक कार्य समिती सभापती प्रियांका पाटील, शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, नगरसेविका नंदिनी विचारे, अतिरिक्त आयुक्त (१) तथा ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, ज्ञानेश्वर ढेरे, नगर अभियंता अर्जुन अहिरे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.


   

                 यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनी ३९ व्या वर्धापनदिना निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. ठाणे नगरीचा नगरपालिका ते महानगरपालिका हा प्रवास फार महत्वपूर्ण असून शहरात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे करण्यात आली आहेत. शहराच्या विकासात महापालिकेचा मोठा वाटा असून सद्यस्थितीत राहण्यासाठी ठाणे शहराला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. ठाण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल असे प्रकल्प यापुढेही राबविले जाणार असल्याचे प्रतिपादन महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी केले.


   

         वर्धापन दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा शुभेच्छा देताना म्हणाले कि ''ठाणे महापालिकेच्यादृष्टीने आजचा दिवस महत्वपूर्ण असून भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षही मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे.  शहरात सुरु असलेले उपक्रम प्राध्यान्याने पूर्ण करून आणखी नव नवीन उपक्रम राबवून ठाणेकरांना उत्तम सेवा देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.'' यासोबतच वर्षभर पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.


    

        दरवर्षी कलामंचाच्यावतीने गायन, वादन, नृत्य, लघुनाटिका अशा विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमाने ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन गडकरी रंगायतन मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. ठाणे महापालिकामध्ये  कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना महापालिका नेहमी  प्रोत्साहन देत असते. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी वर्धापन दिनानिमित्त आपली कला सादर करतात. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांपासून ते अधिकारी वर्गापर्यंत सर्वजण या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन कलाविष्कार सादर करतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ३९ वा वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments