पाणी पुरवठ्या कडे दुर्लक्ष केले तर आम्हाला ठामपाकडे लक्ष द्यावे लागेल गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यांचा सज्जड इशारा
ठाणे (प्रतिनिधी) - कळवा- मुंब्रा भागातील पाण्याद्या गैरसोयीबद्दल जर ठामपाने दुर्लक्ष केले तर आम्हाला ठामपाकडे पहावे लागेल, असा इशारा गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.              कळवा- मुंब्रा-कौसा भागात गेले चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाला डॉ. आव्हाड यांनी मोकळी वाट करुन दिली. कळवा-मुंब्रावासियाांच्या पाणीप्रश्नावर आक्रमक होण्याचा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि युवाध्यक्ष विक्रम खामकर हेदेखील उपस्थित होते.            डॉ. आव्हाड म्हणाले की, पाच दिवसांपासून कळवा- मुंब्रा भागात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. ठाणे महानगर पालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे की ठाणेकरांना पाणी देणे!  त्यामध्ये ठाणे महानगर पालिका कमी पडत असेल तर ठामपाला विचार करावा लागेल. पाच पाच दिवस कळवा मुंब्र्याला पाणी न देणे हे योग्य नाही.           ते काही सावत्र भाऊ म्हणून तुमच्याकडे आलेले नाहीत. जेव्हा पालिका स्थापन झाली तेव्हापासून कळवा- मुंब्रा ठाण्यातच आहे. असे असताना कळवा- मुंब्र्याला पाणी न मिळणे आताा सहन करणार नाही. मी जरी मंत्री असलो तरी ठामपाला इशारा देतोय की, आमच्या पाण्याच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments