भिवंडीत पुन्हा एकदा आगडोंब , 50 हुन अधिक फर्निचर कारखाने आगीत जाळून खाक





भिवंडी दि 16(प्रतिनिधी ) शहर व नजीकच्या गोदाम पट्ट्यात आगीच्या घटना नित्याच्या झाल्या असून शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास भिवंडी ठाणे रस्त्यावरील कशेळी हद्दीतील चामुंडा कॉम्प्लेक्स येथील फर्निचर बनविणाऱ्या कारखान्यांना लागलेल्या आगीत तब्बल 50 हुन अधिक गोदाम जळून खाक झाली आहेत.



              या सर्व कारखान्यां मधून मोठ्या प्रमाणावर लाकूड,कापूस,फोम व रेकझीन साठविलेले असल्याने ही आग पाहता पाहता सर्व कारखान्यात पसरून सर्व कारखाने जळून बेचिराख झाले आहेत.या आगीची माहिती मिळताच भिवंडी कल्याण ठाणे येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझविण्यास सुरवात केली.



             दरम्यान येथील आग ही शॉर्ट सर्किट ने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून सर्व कारखाने हे पत्र्याच्या शेड मध्ये असल्याने ही आग सर्वत्र पसरली ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचे साहित्य कच्चा माल जळून खाक झाला आहे.घटनास्थळी पाण्याची उपलब्धता नसल्याने आग विझविण्यात अडथळा येत असल्याने पाणी नियमित उपलब्ध झाल्यास पहाटे 5 वाजता पर्यंत आग पूर्णतः नियंत्रणात येईल अशी माहिती ठाणे बाळकुम अग्निशामक केंद्रातील अधिकारी हिंदुराव बोंडवे यांनी दिली आहे .




           विशेष म्हणजे हे सर्व कारखाने खाडी लगत पत्र्याच्या शेड मध्ये बनविण्यात आल्याने हे अनधिकृत बांधकाम असल्यास तेथील सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न असून यांना परवाना दिला कोणी या बाबत साशंकता व्यक्त केली जात आहे .दरम्यान ही आग नियंत्रणात असून पहाटे 5 वाजता पर्यंत आग पूर्णतः आटोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात असून सुदैव म्हणजे या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही .

Post a Comment

0 Comments