नवजात बाळ आढळलं बेवारस स्थितीत कल्याण मलंग रोड वरील धक्कादायक घटना बाळाला सोडून जाणारी महिला सीसीटीव्हीत कैद
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण मलंग रोड वरील चेतना शाळा परिसरात रस्त्यालगत आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास चार ते पाच दिवसांचा नवजात शिशु आढळल्याने एकच खळबळ उडाली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक महिला एका रिक्षातून उतरून या बाळाला सोडून गेली. ही महिला याच ठिकाणी असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मानपाडा पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेत सीसीटीव्हीत दिसणाऱ्या महिलेचा शोध सुरू केला आहे.मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मलंगगड रोडवरील चेतना शाळेजवळ असलेल्या वक्रतुंड मेडिकल समोर एका पिशवीत कपड्यात गुंडाळलेले नवजात अर्भक ठेवण्यात आले होते. पहाटे पाचच्या दरम्यान दुकानाचे मालक यांनी ते पाहिले. त्यांनी लागलीच मानपाडा पोलीस ठाण्यात संपर्क साधून याची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. वंजारी यांच्या पथकाने लागलीच घटनास्थळी जाऊन पहाणी केली. पिशवीत पुरुष जातीचे जिवंत अर्भक आढळून आले. त्याला लागलीच तपासणीसाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हलविण्यात आले. आरोग्य तपासणी व अँटिजेन टेस्ट बाळाची करण्यात आली आहे. बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला सध्या देखभालीसाठी जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट येथे ठेवण्यात आले आहे. बालकल्याण समितीची परवानगी घेऊन उल्हासनगर येथे याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही वंजारी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments