पॉईंटमॅनची मक्तेदारी पॉईंट वूमने मोडली. एक महिलेने बदलले पॅसेंजर गाडीचे इंजिन
डोंबिवली ( शंकर जाधव )  एक मुलगी जेव्हा तिच्या बाबांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडते तेव्हा ते स्वप्न नक्कीच पूर्णत्वास जाते याची प्रचिती दिवा स्थानकात आली. एक महिला वडिलांच्या जागी रेल्वेमध्ये नोकरीला लागली. त्यानंतर इंजिनाचा डबा जसा धावतो त्याचप्रमाणे स्वतःच्या कामात प्रगती करत पुरुष मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात लीलया प्रवेश केला.  
            पुरुषांच्या खांद्याला खांदा देत इंजिन चालवले आणि दिवा स्थानकात रत्नागिरी पॅसेंजर गाडी रत्नागिरीला रवाना केली. त्यामुळे पॉईंटमॅनची पुरुषी मक्तेदारी मोडत पॉईंट वुमेनने आपला कर्तव्य बजावले. रुपाली रामा म्हात्रे ही महिला दिवा स्थानकात  पॉईंटमॅन म्हणून काम करते.२७ ते २८ पुरुषांमध्ये ही एकटीच महिला आहे. दिवा फाटक हे मध्य रेल्वेचे सगळ्यात मोठे फाटक आहे. या फाटकामध्ये काम करताना नागरीकांना थोपवून ठेवणे, गाडीच्या वेळा सांभाळून फाटक बंद करणे हे काम पहावे लागते. 
            या व्यतिरिक्त काही पॅसेंजर रेल्वेचे इंजिन बदलणे महत्वाचे असते. मात्र आत्तापर्यंत झालेल्या सर्व्हिस मध्ये एकदाही इंजिन बदलण्याचे काम या महिलेला करण्यास मिळाले नव्हते. पुरुष मक्तेदारी असणाऱ्या या क्षेत्रात इंजिन बदलण्याची संधीच मिळाली नाही. मात्र त्यादिवशी योगायोगाने ही संधी  मिळाली आणि ती मी साधली असे सांगतानाच आमच्या ट्रेनिंग मध्ये जे काही शिकवलं गेलं यामुळेच मी हे करू शकले अशी माहिती रुपाली अभिमानाने देत होती.
            गाडीचे मुंबई दिशेकडे असणारे इंजिन कल्याण बाजूला लावून ह्या गाडीला हिरवा सिग्नल देत कोरोना नंतरची पहिली रत्नागिरी पॅसेंजर गाडी रत्नागिरीला रवाना केल्याचे तिने यावेळी सांगितले. गणपती बाप्पाच्या उत्सवानिमित्त कोकणवासीयांसाठी शिवसेनेतर्फे २०० बसेस कल्याण डोंबिवली विभागातून विविध ठिकाणाहून सोडण्यात आल्या. 
            यावेळी गोपीनाथ चौकातील समाजसेवक बाळा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात  रुपाली म्हात्रे यांचा डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळीमाजी नगरसेविका कविता म्हात्रे,  शिवसैनिक संदीप सामंत, अनमोल म्हात्रे, ऍड.गणेश पाटील, कैलास सणस, भाई पाणवडीकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments