कल्याण , कुणाल म्हात्रे : वालधुनी नदीपात्राशेजारी अनेक अतिक्रमणे झाली असून वालधुनी नदीत अनधिकृत भराव टाकल्या प्रकरणी मे.सेंचुरी रेयॉनला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने नोटिस बजावली असून याबाबत खुलासा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
वालधुनी नदी किनारी मेसर्स सेंचुरी रेयॉन यांची जागा आहे. जेथे सन २००० च्या दशकात मोठ मोठे डंपर कित्येक वर्षे भरणी टाकत होते. तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना हा काय प्रकार आहे हे नक्की माहित पडत नव्हते. हा भराव थेट वालधुनी नदीच्या पात्रात येऊन पोहचला होता. त्यावर वनीकरण करण्यात आले. नंतर काही वर्षांनी येथे बिर्ला इस्टेट विकासकाच्या नावाने इमारती बांधण्यास सुरुवात झाली. येथे भराव टाकल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात वालधुनी नदीचा पावसाळी येणाऱ्या पुराची तीव्रता वाढली.
२००५, २०१९ व आता २०२१ साली आलेल्या महापुरास सेंचुरी रेयॉनने वालधुनी नदीत टाकलेली भरणी देखिल कारणीभूत आहे. यामुळे हे पाणी रहिवाशी भागात घुसले असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. सेंचुरी रेयॉनची जागा मूळ स्थितित असताना हे पाणी तेथे पसरत असल्यामुळे या भागात फक्त जुन्या भवानी नगर विभागात पूर येत होता. आणि पुराची तीव्रता नगण्य होती. आता हा पूर योगीधाम त्रिमुर्ती कॉलनी, अनुपम नगर, घोलप नगर आणि आसपासच्या परिसरात देखिल येऊ लागला आहे.
कल्याण शहरातील जागरूक नागरिक वालधुनी स्वच्छ्ता समितीचे पदाधिकारी विनोद शिरवाडकर यांनी नदीतील हा अतिरिक्त भराव काढून टाकण्याबाबत व भविष्यात येथे नदी पात्रात कोणतीही अनधिकृत भिंत नदी पात्रात बांधू नये. या संबंधी तक्रार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, कल्याण तहसीलदार, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण यांना केली होती.
यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने महापालिकेने मेसर्स सेंचुरी रेयॉनच्या नावे सी.ई.ओ. के. टि. जिथेंद्रन (बिर्ला इस्टेट), तसेच वास्तूशिल्पकार शोभना देशपांडे यांच्या नावे नोटिस बजावली आहे. ज्यायोगे नोटिस बजावल्या पासून एक आठवड्यात संबंधित कार्यालयात खुलासा करावा असे आदेश पारित केले आहेत. अन्यथा आपल्याला काही म्हणावयाचे नाही असे समजून पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
0 Comments