शहरातील वाहतूक कोंडी प्रश्नां बाबत खासदार राजन विचारे यांनी महापौर व महापालिका आयुक्त यांच्यासोबत सर्व यंत्रणांचा घेतला आढावा


■मेट्रोचे काम बंद असणाऱ्या ठिकाणांचे बॅरिकेट २ दिवसात हटवून रस्त्याची दुरुस्ती, खड्डे भरणी तात्काळ करा: खासदार राजन विचारे...


ठाणे , प्रतिनिधी   :  शहरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडी प्रश्नांबाबत खासदार राजन विचारे यांनी आज महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासोबत सर्व संबंधीत यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. दरम्यान शहरात मेट्रोचे ज्या ठिकाणी काम सुरू नाही तेथील बॅरिकेट तात्काळ हटवून सर्व रस्त्याची दुरुस्ती तसेच खड्डे भरणी तात्काळ करण्याचे आदेश खासदार राजन विचारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच महापालिका क्षेत्रातील ज्या ठिकाणी अजूनही खड्डे भरणीचे काम सुरू आहे तेथे वाहतूक पोलीस शाखेशी समन्वय साधून कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.        ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात खासदार  राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उप महापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, वाहतूक पोलीस उप आयुक्त श्री. राठोड, निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी, नगर अभियंता अर्जुन अहिरे यांच्यासह शहर वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग तसेच मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.        पावसाळ्यापूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे भरणी व रस्ते दुरुस्ती करण्यात आली आहे. परंतु काही दिवसापूर्वी झालेल्या संततधार पाऊस आणि अवजड वाहतूक यामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्डे तसेच मेट्रोच्या कामांमुळे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेवून ठाणे महापालिकेच्यावतीने तसेच इतर यंत्रणामार्फ़त शहरात खड्डे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शहरात सुरू असलेल्या या कामाचा आज खासदार राजन विचारे यांनी प्रत्येक विभागनिहाय आढावा घेतला.

           


       शहरात मेट्रोचे काम सुरू असून ज्या ठिकाणी काम सुरू नाही अथवा काम बंद आहे तेथील बॅरिकेट तात्काळ हवण्याचे आदेश मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी असलेल्या गटर्सची साफसफाई करून तेथील माती व इतर साहित्य २ दिवसात उचलण्याचे आदेश त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच रस्त्याच्या साईड पट्टयाचे कामही ८ दिवसात तात्काळ पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.          तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग या सर्व यंत्रणांनी त्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती तसेच खड्डे भरणी तात्काळ करण्याचे आदेश खासदार राजन विचारे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी शहरात महापालिकेच्या वतीने रस्ते दुरुस्ती तसेच खड्डे भरणीचे जी कामे सुरू आहेत सर्व कामे वाहतूक पोलिस शाखा यांच्या समन्वयातून युद्ध पातळीवर करण्याचे आदेश महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी सर्व यंत्रणांना दिले.

Post a Comment

0 Comments