कोरोना समुपदेशन समितीच्या वतीने पालक व बालकांचे समुपदेशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आपली मुलेच आपली संपत्ती असल्याने मुलांच्या शारिरीक आरोग्याकडे लक्ष देतांना मानसिक आरोग्याकडे देखिल पालकांनी लक्ष दयावे असे आवाहन शासनाच्या रस्ते सुरक्षा विभागाचे कमांडर  मणिलाल शिंपी यांनी  केले. कोरोना समुपदेशन समितीच्या  विदयमाने कल्याण येथील स्वामी नारायण हाॅल येथे आयोजित केलेल्या पालक व बालक समुपदेशन कार्यक्रमाचे उदघाटन करतांना  मणिलाल शिंपी बोलत होते.      याप्रसंगी  समितीचे अध्यक्ष अनिल काकडे, मानसोपचार तज्ञ  डाॅ. भूषण पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनेश ठक्कर,  समुपदेशक मधुरा कोपरकर,  कोरिओग्राफर कौशल देढिया,  आर एस पी अधिकारी  जितेंद्र सोनवणे उपस्थित होते.         यासमयी  मानसोपचार तज्ञ डाॅ. भूषण पाटील म्हणाले कि पालकांनी मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे. तो  असा का वागतो याचा शोध घेतला पाहिजे.  आताच्या काळात लहान मुले व्यसनाच्या  आणि  गुन्हेगारीच्या  आहारी जात आहेत  हि चिंतेची बाब आहे. मुलाचे मित्र कोण याची माहिती मिळवण्यासाठी घरातच एक छोटे खानी कार्यक्रम आयोजित करावा व त्यात मुलाच्या  मित्रांच्या नकळत लक्ष ठेवले पाहिजे. मुले मोबाईलवर जास्त गुंतत असतील तर त्यांना पर्याय म्हणून  खेळ दिला पाहिजे. पालकांनी देखिल त्यांच्यासोबत खेळले पाहिजे.          मुलांच्या उंचीनुसार वजन नसेल तर स्मरणशक्तीवर परिणाम होतो म्हणून  प्रोटिनयुक्त आहार दयावा. योग्य वेळी संकोच न बाळगता लैंगिक शिक्षण दिले पाहिजे. पालकांनी देखिल आपली वर्तणूक चांगली ठेवली तर चांगले संस्कार होऊन मुले देखिल चांगलेच घडतील असे मत देखिल डाॅ. भूषण पाटील यांनी व्यक्त करून पालकांकडून आलेल्या प्रश्नास मुद्देसूद तपशीलवार उत्तर देऊन समाधानी केले. तसेच डाॅ. भूषण पाटील यांनी यावेळी   प्रोजेक्टरवर सादरी करून पालकांना विषय समजावून सांगितला.           कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात समुपदेशक मधुरा  कोपरकर यांनी मुलांना विविध प्रश्न विचारून, चित्रे काढण्यास लावून समूह समुपदेशन केले तर  सुप्रसिद्ध कोरिओग्राफर कौशल देढिया यांनी पालकांना आणि मुलांना नृत्य करायला लावून तणावमुक्त कसे व्हावे हे समजावून सांगितले.            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष अनिल काकडे, एकनाथ जाधव, प्रथमेश पुण्यार्थी, विनायक शेणवी, संदिप धोपटे, योगेश धमेले, विनायक भोईर, संजय शिंदे,   विनय ताटके, सुषमा सहस्त्रबुद्धे, नयना नायर , अनुराधा जाधव, तृप्ती दोडवाल, अल्पा राजगोर, प्रणिता भोसले, मंगला आरोटे, वंदना तुपे, राणी जोशी, भक्ती चव्हाण इत्यादींनी  परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments