कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण माळशेज महामार्गा वरील म्हारळगाव येथे गेल्या अनेक महिन्यांपासून म्हारळगाव थारवाणी बिल्डिंग ते ताबोर आश्रम कांबा पावशे पाडा पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे येथील रस्ता बनविण्याच्या मागणीसाठी येथील स्थानिकांनी उपोषण करत आंदोलन केले.
या ठिकाणी रोज अपघात होत असतात, स्थानिकानी सतत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला तरीही कोणती ही कारवाई होत नाही. यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव, महेश देशमुख, अश्विन भोईर, विवेक गंभीरराव, योगेश देशमुख, लक्ष्मण सुरोशी, निकेश पावशे, अशफ़ाक शेख आदींसह जीप मालक चालक संघटना, रिक्शा संघटना, कल्याण मुरबाड महामार्ग प्रवासी यांनी एकदिवसीय उपोषणाचे अस्त्र उगारले.
या आंदोलनात स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, मनसे ग्रामीण, मनसे उल्हासनगर, आमदार कुमार आयलानी, जीप चालक संघटना, अपंग आधार कल्याणकारी संघटना देखील सहभागी झाले होते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी जागेवर पोहोचत उपोषणकर्त्यांची समजूत काढत रस्ता बनविण्याचे आश्र्वासन दिले.
रस्ता बनवण्याचे पत्यक्ष काम ७ ऑक्टोबरला सुरु होणार आहे, तत्पूर्वी जाण्यायेण्यासाठी डांबरीकरण केले पाहिजे, रस्त्याच्या बाजूकडील गवत काढणे, माळशेज मुरबाड मार्गे मुंबई भिवंडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रायता पुलापासुन कल्याण बायपास रस्ता तयार करणे अशा अनेक मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या. दरम्यान लवकर काम सुरु न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.
0 Comments