मराठी कवयित्रींच्या अजरामर गीतांनी बहरला ब्रह्मांड कट्टा
ठाणे, प्रतिनिधी  :  गणपतीबाप्पाला निरोप देताना जड झालेल्या मनांना प्रफुल्लित करण्यासाठी ब्रह्मांड कट्टा ठाणे या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रेसर संस्थेने आपल्या रसिक श्रोत्यांसाठी बहारदार गीतांची भेट आणली. रविवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी ऑनलाईन माध्यमातून 'मर्मबंध काव्य गीतांचे' हा मराठी कवयित्रींच्या लेखणीतुन जन्मलेल्या अजरामर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. अनेक मराठी कवयित्रींनी आपल्या लेखणीतून काव्यांचा खजिनाच जणू आपल्याला दिलेला आहे व मराठी भाषा समृद्ध करुन साहित्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.           या भावनाप्रधान शब्दांना जेव्हा स्वरतालाचा साज चढला तेव्हा जन्मली अजरामर मराठी गीते!  बहिणाबाई चौधरी, संत जनाबाई, शांता शेळके, इंदिरा संत, वंदना विटणकर, शांता जोशी, अश्विनी शेंडे या चतुरस्त्र मराठी कवयित्रींची बालगीतांपासुन ते लोकगीत, नाट्यसंगीत, लावणी, चित्रपटगीते यांचा सामावेश असलेली बहारदार मराठी गाणी गायिका ऋजुता देशपांडे, संपदा दळवी व बाल कलाकार विवान देशपांडे यांनी सादर करुन काव्य व गीत यातील मर्मबंध चपखल साधला. गायनाबरोबरच निवेदनाची धुरा सांभाळत ऋजुता व संपदा यांनी रसिकांशी मनमोकळा व माहितीपूर्वक संवाद साधला.           ऋजुता व संपदा यांनी शांता शेळके रचित 'गणराज रंगी' या गीताने गणरायाला वंदन करुन कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. ऋजुता यांनी कवयित्री शांताबाई जोशी यांच्या 'आभाळीचा चांद' या भक्तिरसाने परिपूर्ण अभंगाने सुमधुर सुरुवात करुन शास्त्रीय रागदारीतील 'ना मानोगो तो',  संगीत नाटकाच्या काळाची अनुभूति देणारे 'विकल मन आज' ही शांता शेळके रचित गीते गाऊन गायकीतील चतुरस्त्रपणाचे सुरेल दर्शन घडविले. तसेच ऋजुता यांनी गायलेल्या शांता शेळके यांनी लिहिलेल्या ' दिसते मजला' व 'शालु हिरवा' या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.           बाल कलाकार विवान याचे वंदना विटणकर लिखित 'ए आई' हे लाडिक साद घालणारे गाणे ऐकुन रसिकांनादेखील पावसात भिजावेसे वाटले. शांता शेळके यांचे 'खोडी माझी काढाल तर' या विवान याने गायलेल्या धमाल गीताने प्रेक्षकांनीही बालपण अनुभवले. संपदा यांनी संत जनाबाई रचित ' ये ग ये ग विठाबाई' हा भक्तीने ओतप्रोत भरलेला अभंग आर्ततेने सादर केला. शांता शेळके रचित स्तवन ' जय शारदे वागेश्वरी', इंदिरा संत यांचे ' रक्तामध्ये ओढ मातीची', वंदना विटणकर यांचे 'कुहू कुहू येई साद' ही गीते उत्कृष्टरित्या सादर केली.  संपदा यांनी गायलेल्या शांता शेळके रचित 'रेशमाच्या रेघांनी' या लावणीने रसिकांची मने जिंकली. ऋजुता व संपदा यांनी बहिणाबाईंच्या ओव्या तसेच उभरत्या कवयित्री अश्विनी शेंडे यांची मालिका शीर्षकगीते गाऊन मैफिलीची रंगत वाढवली. 
         शरद शिधये यांनी संवादिनी व सिद्धार्थ  वैद्य यांनी तबला अशी वाखाणण्याजोगी उत्तम  साथ देऊन गाण्यांच्या सौंदर्यात भर पाडली. हृषिकेश पंडित व पार्थ घाग यांनी साईड रिदमवर छान साथ दिली. ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव व अध्यक्ष महेश जोशी यांनी कलाकारांचे स्वागत केले. शांता शेळके यांच्या लेखणीतुन साकारलेल्या जीवनाचा सकारात्मक दृष्टीकोन शिकवणाऱ्या 'जीवनगाणे गात रहावे' या  गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. परंतु अतिशय सुंदर आशय असलेली शब्दस्वरांची ही मैफिल रसिकांच्या मनात घर करुन गेली.

Post a Comment

0 Comments