■संकेत बहुउद्देशीय विकास संस्थेने दिला होता उपोषणाचा इशारा केडीएमसी आणि तहसील प्रशासना कडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन...
कल्याण , कुणाल म्हात्रे : दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे वालधुनी परीसारतील नागरिकांचे नुकसान होते. या विरोधात संकेत बहुउद्देशीय विकास संस्थेने उपोषणाचे आयोजन आज केले होते. या उपोषणस्थळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील भेट देणार होते. आठवले यांच्या उपोषण स्थळाच्या दौऱ्याचे नियोजन होताच केडीएमसी आणि तहसील प्रशासनाला खडबडून जाग आली असून केडीएमसी आणि तहसील प्रशासनाकडून येथील नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
वालधुनी नदीला येणाऱ्या पुरामुळे येथील आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरत असते. यामुळे येथील नागरिकांच्या घरातील वस्तूंचे आणि मालमत्तेचे नुकसान होते. या नुकसानानंतर शासनाकडून येथील नागरिकांना नुकसानभरपाई देखील देण्यात आलेली नाही. याबाबत पाठपुरावा करून देखील तहसील प्रशासनाने पूरग्रस्तांना मदत देण्यात आली नाही.
तसेच वालधुनी नदीच्या किनारी रेल्वे रूळाच्या खालील बोगद्यापासून ते कल्याण उल्हासनगरच्या पुलापर्यंत ४ फुट रुंद आणि १२ फुट उंच भिंत बांधणे, ओम टॉवर लक्ष्मी टॉवर गीतांजली बेकरी परिसरातील कचरा आणि मातीचा ढिगारा उचलणे, १७ मे १९३६ साली शिवाजी नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते.
त्याठिकाणी त्यांच्या नावाने वाचनालय सुरु करणे, तसेच वालधुनी परिसरात अनेक नागरिक हे गेल्या ३० ते ४० वर्षांपासून १०० वर्षांच्या भुईभाडे करारावर राहत असून त्यांना घरांची उंची वाढविण्यासाठी परवानगी देण्यात यावी आदी मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे करण्यात आल्या होत्या.
तहसील प्रशासन आणि केडीएमसी प्रशासनाने या मागण्या मान्य न केल्याने संकेत बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील घेगडमल यांच्या नेत्तृत्वाखाली स्थानिक महिलांनी उपोषणाचे आयोजन आज केले होते. या उपोषणाला आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले भेट देण्यासाठी येणार होते.
आठवले यांच्या या दौऱ्याचे नियोजन होताच केडीएमसी प्रशासन आणि तहसील प्रशासन खडबडून जागे होत उपोषण कर्त्यांना त्यांच्या मागण्या येत्या काही दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार सुषमा बांगर आणि केडीएमसी प्रभाग अधिकारी वसंत भोंगाडे यांनी दिले आहे. दरम्यान लवकरात लवकर या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुनील घेगडमल यांनी दिला आहे.
0 Comments