दिव्यांग कला केंद्रात झाला अनोखा गणेशोत्सव विशेष मुलांनी दिला पर्यावरण समतोलाचा संदेश


■दिव्यांग कला केंद्रातील गणेशोत्सवात  किरण नाकती यांच्या संकल्पनेतील बाप्पाचे झाड...


ठाणे , प्रतिनिधी  :  भाद्रपद महिना लागला की सगळ्यांना चाहूल लागते ती लाडक्या बाप्पाची.. बाप्पाच्या आगमनासाठी सगळे सज्ज होतं असतात. मात्र बाप्पाचा सणाचा आनंद दिव्यांग मुलांना घेता यावा ,त्यांना देखील गणेश चतुर्थी सणाचे महत्व समजावे यासाठी आदित्य प्रतिष्ठान , ठाणे संचालित दिव्यांग कला केंद्रात किरण नाकती यांच्या बाप्पाचं झाड या संकल्पनेतून   अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव झाला. विशेष म्हणजे या बाप्पाची पूजा ,आरती या केंद्रातील दिव्यांग मुलांनी करत बाप्पाचा सण साजरा करताना पर्यावरण समतोलाचा संदेश दिला. गणेश चतुर्थी च्या आदल्या दिवशी दिव्यांग कला केंद्रात साजरा झालेल्या या उत्सवात केंद्रातील दिव्यांग मुले मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.या प्रसंगी दिव्यांग कला केंद्र च्या मुख्याध्यापिका संध्या नाकती ,परेश दळवी ,वुई आर फॉर यूचे सर्व सेवेकरी ,दिव्यांग कला केंद्रातील विद्यार्थ्यांचे पालक आदी या उत्सवात सहभागी झाले होते.  यावेळी दिव्यांग मुलांच्या उपस्थिती मध्ये लाल माती पासून बनवलेला मात्र त्यात बियांची रुजवण असलेला बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया च्या गजरात करोना नियमांचे पालन करून केंद्रात विराजमान झाला. या अनोख्या बाप्पासाठी केवळ रंगीत फुले ,विविध पाने आणि झाडांची सुंदर आरास केंद्रात करण्यात आली होती. बाप्पाचे केंद्रात जल्लोषात आगमन झाल्यावर विधिवत बाप्पाची पूजा आणि आरती केंद्रातील दिव्यांग मुलांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंदाची लकेर उमटली होती. दिवसभर बाप्पाचा हा उत्सव साजरा केल्यावर त्याचे विधिवत विसर्जन केंद्रातच करण्यात आले. त्यातून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत सणांच्या निमित्ताने होणारे प्रदूषण टाळावे असा महत्वपूर्ण संदेश दिला. या बाप्पाच्या विसर्जनानंतर त्यातील बियांची रुजवण केंद्राच्या परिसरात करण्यात असल्याची माहिती दिव्यांग कला केंद्राचे प्रमुख किरण नाकती यांनी दिली. त्यामुळे केवळ दीड ,पाच ,दहा दिवस बाप्पाचा उत्सव साजरा न करता कायम बाप्पाच्या आशीर्वादाची सावली आम्हा सर्वांवर रहावी अशी इच्छा  नाकती यांनी व्यक्त केली. 

Post a Comment

0 Comments