डांबरी करण केलेले रस्ते अवघ्या 12 तासात उखडले ठेकेदार मस्त अन् ठाणेकर त्रस्त - शानू पठाण
ठाणे (प्रतिनिधी)  -  डांबरीकरण केल्यानंतर अवघ्या 12 तासातच रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याचा प्रकार मुंब्रा येथे घडला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी रस्त्यावर उतरुन ठेकेदारांच्या या प्रतापाची पोलखोल केली. दरम्यान, ठाणेकर रस्त्यातील खड्ड्यांमुळे त्रस्त असतानाही ठामपा आयुक्त ठोस कारवाई करीत नसल्याने ठेकेदार मस्त रहात आहेत, अशी टीका शानू पठाण यांनी केला.          ठाणे महानगर पालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यावरुन टीका होऊ लागल्याने रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. मात्र, हे डांबरीकरणही निकृष्ठ दर्जाचे आहे. याची पाहणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली.  मुंब्रा भागातील रस्त्यांचे सोमवारी रात्री डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी सकाळी या रस्त्यांवरील हे डांबर उखडून निघाले असल्याचे दिसून आले.           पठाण यांच्यासह दिनेश बने यांनी या रस्त्यांवर टाकण्यात आलेला डांबर हाताने उखडून दाखविले.  या संदर्भात पठाण यांनी सांगितले की, ठाणेकरांच्या करातून ही कामे केली जात आहेत. मात्र, त्यांच्या या कराच्या पैशांचा ठामपाकडून अपव्यय केला जात आहे. पालकमंत्र्यांच्या दौर्‍यामध्येही डांबरीकरणाचा हा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्यानंतरही पालिका आयुक्तांकडून ठोस कारवाई केली जात नसल्यानेच ठेकेदार कोणालाही जुमानत नाहीत.       स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ठाणेकरांचा पैसा पाण्यात घालत आहेत. डांबरीकरणाच्या नावाखाली केवळ खडी टाकण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचे डांबर, रसायन याचा वापर केला जात नाही. त्यामुळेच अवघ्या 12 तासात रस्ते उखडत आहेत. असे काम करणार्‍या कंत्राटदारांवर कारवाई करुन त्यांना काळ्या यादीत टाकावे, अन्यथा आम्ही या ठेकेदारांना आमच्या पद्धतीने धडा शिकवू, असा इशाराही यावेळी शानू पठाण यांनी दिला.

Post a Comment

0 Comments