शहापूर येथील प्रशिक्षण शिबीरात 118 शेतकऱ्यांनी केली आंब्याची ‘जीआय’ नोंदणी जीआय मानांकनामुळे निर्यातीला चालना मिळणार
ठाणे, दि. 28 (जिमाका)  : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंब्याचे भौगोलिक मानांकन (जीआय) करणे सोयीचे व्हावे यासाठी आज विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या माध्यमातून शहापूर येथे नोंदणी आणि प्रशिक्षण शिबीर आजित करण्यात आले. त्यामध्ये सुमारे 118 आंबा उत्पादकांनी भौगोलिक मानांकनासाठी नोंदणी केल्याचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी सांगितले.


■वाफेपाडा ता.शहापूर येथील सत्यधर्म आश्रम या ठिकाणी आंबा भौगोलिक मानांकन नोंदणी व मँगोनेट प्रशिक्षण घेण्यात आले.           हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना निर्यातीमध्ये प्राधान्य मिळणार असून परिणामी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होणार असल्याचे श्री. माने यांनी सांगितले. तसेच या आंब्याची बाजारपेठेत वेगळी ओळख मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.          ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. त्या अनुषंगाने सर्व हापूस आंबा उत्पादक व विक्रेते यांनी त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रत्नागिरी येथील कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेमध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे.         मात्र ठाणे आणि पालघर  मधील शेतकऱ्यांना रत्नागिरी येथे जायची गरज भासू नये यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने यांनी पुढाकार घेऊन कोकण हापूस आंबा उत्पादक व उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित यांच्या पदाधिकाऱ्यांना शहापूर येथे नोंदणीची प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आज नोंदणी आणि प्रशिक्षण कार्यक्रम झाला.        यावेळी कृषी उपसंचालक श्री. कुटे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. पाचे, तंत्र अधिकारी श्री. घोलप, शहापूर तालुका कृषी अधिकारी श्री. अगवान साहेब आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments