वाहन पासिंग मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची तृतीय पक्षा मार्फत चौकशी करा


■राष्ट्र कल्याण पार्टीची उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे मागणी...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  वाहन पासिंग मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची तृतीय पक्षा मार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीने केली असून याबाबत पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांच्या शिष्टमंडळाने कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे. यावेळी महासचिव राहुल काटकर, पवन दुबेप्रविण के. सी.राज द्विवेदी आदी पदाधिकारी उपस्थित होते.कल्याण पूर्वेतील नंदिवाली तलाव येथे कल्याण व ठाणे आरटीओ मधील गाड्यांचे पासिंग करण्यात येते. या ठिकाणी  आरटीओ अधिकारीदलाल व काही स्थानिक मिळून वाहन पासिंग करताना वाहन चालक, मालक यांची लुट व फसवणूक करत आहेत. या ठिकाणी वाहन पासिंग करताना लाखों रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. शनिवार व रविवार या दिवशी काही विशेष दलालांच्या गाड्यांचे पासिंग करण्यात येत आहे. आरटीओ नियमानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी वाहन पासिंग करण्यात यावे. तसेच प्रत्येक अधिकारी जास्तीत जास्त ४० वाहन पासिंग करु शकतात.काही दलाल गाडी पासिंग करण्यासाठी ऑनलाइन मध्ये देण्यात आलेल्या तारखेला वाहन पासिंग न करता शनिवार व रविवार या दिवशी वाहन पासिंग करतात. वाहन पासिंग साठी आरटीओ नियमानुसार गाडी मध्ये काही त्रुटी असताना व आवश्यक कागद पत्र नसताना देखील अधिकारी व दलाल आर्थिक संगणमत करुन वाहन पासिंगकरत आहेत. तसेच वाहन पासिंग साठी बुक मध्ये लेखा जोखा देखील करत नाहीत. पासिंग साठी आलेल्या वाहन चालक मालक यांच्या कडुन अनधिकृत पणे पार्किंग साठी १०० रुपये घेतले जात आहेत. पार्किंगची पावती (बनावट पावती) असल्या शिवाय अधिकारी गाडी पासिंग करत नाहीत.
पासिंग साठी आलेल्या वाहन चालक मालक यांच्याकडुन अनधिकृत पणे गाडी सॅनिटायझर करण्यासाठी म्हणून जबरदस्ती १०० रुपये घेतले जात आहेत. सॅनिटायझर केल्याशिवाय अधिकारी गाडी पासिंग करत नाहीत. पासिंगसाठी आलेल्या वाहन चालक मालक यांना गाडीला विशेष व्यक्ती कडुन गाडीला रेडीयम लावण्यासाठी सक्ती अधिकारी यांच्या कडुन करण्यात येत आहे. हे सर्व भ्रष्टाचाराचे प्रकार असून यामुळे  नागरिकांची मोठी लुट होत असल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीने केला आहे.
या सर्व मुद्दयांवर ७ दिवसात तृतीय पक्षा मार्फत चौकशी करुन चालु असलेला भ्रष्टाचार त्वरित थांबवून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अन्यथा राष्ट्र कल्याण पार्टी तर्फे आरटीओ कार्यालयामध्ये तिव्र आंदोलन करण्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांना देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments