महाराष्ट्रात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि. 22 -  महाराष्ट्राचे राजकारण असे आहे की कोणताही पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही.राज्यातील काँग्रेस; राष्ट्रवादी काँग्रेस; शिवसेना आणि भाजप हे चारही मोठे पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही आणि त्यांचे लोकप्रतिनिधीही निवडून आणू शकत नाही.त्यासाठी दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन युती करावी लागते. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष ही युती चे राजकारण करीत असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.            नाशिक च्या सटाणा नगर परिषदेतर्फे उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या भूमीपूजन ना रामदास आठवले यांच्या हस्ते झाले त्यावेळी दगाजी  चित्रमंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत ना रामदास आठवले बोलत होते.यावेळी सटाणा नगर परिषदेतर्फे ना रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला.अनेक वर्षांनंतर ना रामदास आठवले सटाणा शहरात आले असल्याने त्यांना भेटण्यास पाहण्यास आणि ऐकण्यास सटाणा;  देवळा;बागलाण; नाशिक आणि धुळे येथील त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. शहरात जागोजागी ना रामदास आठवले यांचे भव्य स्वागत करण्यात आले.           1998 मध्ये काँग्रेस सोबत युती केल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार लोकसभेत निवडुन आले होते. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी राजकीय निर्णय घेत असतो. केंद्र सरकार मध्ये मी सहभागी झाल्यापासून संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढला आहे.काश्मीर ते कन्याकुमारी ; आसाम पासुन गुजरात पर्यंत संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढला आहे असे ना रामदास आठवले म्हणाले. यावेळी सटाणा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील मोरे;आमदार दिलीप बोरसे रिपाइं चे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे  ; राज्य सचिव श्रीकांत भालेराव;चंद्रशेखर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.सटाणा नगरीच्या विकासासाठी खासदार निधी देण्याची मागणी नगराध्यक्ष मोरे यांनी केली असता ना रामदास आठवले म्हणाले की

 माझ्या कडे काय मागायचे ते मागा 


कारण मी आहे तुमच्या साठी जागा 


माननीय उद्धव ठाकरेंच्या मागे तुम्ही लागा


मग मी फुलवून दाखवितो सटाण्याच्या बागा 


अशी कविता सादर केली. 


भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्कर्षासाठी काम केले मात्र त्यांनी देश घडविण्याचे ही काम केले आहे.नदीजोड प्रकल्प त्यांनी देशाला सुचविला. त्यांनी दामोदर व्हॅली ची निर्मिती केली. विविध जाती धर्माच्या विविध भाषेच्या;गरीब श्रीमंत सर्व वर्गाच्या  माणसांना एकत्र जोडणारा समतेचा मार्ग ; राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असे ना. रामदास आठवले म्हणाले.

   

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव नाशिक विमानतळाला मिळाले पाहिजे ही आंबेडकरी जनतेची जुनी मागणी असून या मागणीच्या पूर्ततेसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची आपण शिष्टमंडळासह भेट घेऊ असे ना रामदास आठवले म्हणाले.

Post a Comment

0 Comments