ब्रह्मांड करांच्या वतीने महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात

 ठाणे, प्रतिनिधी :  महाराष्ट्राचा स्वर्ग म्हणुन ओळख असलेले निसर्गरम्य कोकण पूरपरिस्थितीमुळे उन्मळून पडलेले आहे. या भीषण परिस्थितीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सहकार्याचा ओघ हा सुरु आहे. ब्रह्मांड मधील काही सोसायटी मेंबर्स यांनी एकत्रितपणे पूढे येऊन स्वतःलाही या कार्यात सामावून घेण्याचे ठरवले आणि  ब्रम्हांड रेसिडेंट्स वेलफेअर ग्रुप,आझाद नगर मल्याळी समाजम्, ब्रह्मांड श्री अय्यप्पा भक्त संगम, नारायण सेवा समिति व ब्रह्मांड कट्टा या संस्थांनी संयुक्त विद्यमाने महाड येथील पूरग्रस्त बंधुभगिनींना पुन्हा उमेदीने उभे करण्यास आपली हालचाल सुरू केली.             'मदत नव्हे कर्तव्य' या संकल्पनेतून अनेक हात पूढे सरसावले. जलसंकट झेलणार्‍या पूरग्रस्तांसाठी या सर्व संस्थांनी एकत्रितरित्या धान्य, रजया व इतर गृहोपयोगी वस्तुंचे पॅकेट्स करुन ५५० गरजू ग्रामस्थांपर्यंत पोहोचवले. महाड येथील विठ्ठलवाडी, बौद्धवाडी, चव्हाणकोंड, धोंडगे आळी, गवळ आळी, धाडवे आळी, सुतार आळी, कांबळे आळी, खेडेकर आळी, जागडे आळी, बौधावाडी अशा विविध भागात मदत वाटप करण्यात आले.
           या सर्व संस्थांच्या कार्यकारी सदस्यांनी स्वत: महाड येथील विविध पूरग्रस्त भागांना भेट देऊन लोकांचे सांत्वन केले व जातीने प्रत्येक कुटुंबासोबत चर्चा केली व जमा झालेल्या उपयोगी वस्तू त्यांना सुपूर्द केल्या . महाडमध्ये मदतीचा ओघ सुरु असला तरी प्रत्येक गावापर्यंत मदत पोहोचत आहे की नाही व तीव्र गरज असलेल्या वस्तु पोहोचत आहेत की नाहीत, वस्तुंची गुणवत्ता याकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे.             अशा परिस्थितीत नियोजित काळात व अत्यंत सुसूत्रबद्धतेने प्रत्येक कुटुंबाच्या हाती निकड असलेली मदत पोहोचवल्याबद्दल या संस्थांचे ग्रामस्थांनी कौतुक केले व आभार मानले. या मदतवाटपासाठी जे.डी.के.एम्. ग्रुप, पुणे यांच्या स्वयंसेवकांनी हातभार लावला व सुयोग्य मार्गदर्शन केले.            कोरोनाने माणसामाणसातील अंतर वाढवले परंतु मनामनातील अंतर कमी करुन बंधुत्वाचे व मानवतेचे नाते घट्ट करा असा सुंदर संदेश देत ब्रह्मांडकरांनी समाजकार्यात आपली मोहोर उमटवली.

Post a Comment

0 Comments