अश्विनी मुजुमदार यांच्या ' मोहोर' काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न

डोंबिवली ( शंकर जाधव )  कवीचे मन हे समाजातील प्रत्येक घटना टिपून घेत असते. कोणत्याही छोट्या घटनेचा स्पर्श त्याच्या मनास झाला की त्याच्या डोळ्यात टचकन पाणी येते. अशा हळव्या कवीमनाची व्यक्ती उत्तम कविता करू शकते.        अश्विनी मुजुमदार या अशाच हळव्या कविमनाच्या कवयित्री आहेत " , असे प्रतिपादन आमदार आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक चळवळ या मासिकाचे संपादक रविंद्र चव्हाण यांनी केले. कवयित्री अश्विनी मुजुमदार यांच्या मोहोर काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. 


   
        " जीवनातील अनुभवांना शब्दांचे कोंदण लाभले की कविता जन्माला येते आणि या उतमोत्तम कवितांचा एकत्र निर्भेळ आनंद घ्यायचा असेल तर 'मोहोर ' हा काव्यसंग्रह वाचावयास हवा. निसर्गातील विविध बदल , जीवनातील विविध अनुभव , कौटुंबिक जीवनातील विविध प्रसंग , समाजातील विविध घटना यावर अश्विनी मुजुमदार यांची कविता प्रकाश टाकताना दिसते.           कवयित्रीच्या कल्पनाशक्तीला आणि प्रतिभेला फुटलेला मोहोर म्हणजे या कवितासंग्रहाची निर्मिती होय.  गेल्या सव्वा वर्षाच्या काळातील नकारात्मक वातातावरणातील हा एक सकारात्मक क्षण म्हणजे या कविता संग्रहाचे प्रकाशन आहे " असे प्रतिपादन लेखक व संपादक  डॉ. योगेश जोशी यांनी केले. अश्विनी मुजुमदार यांची कविता कशी आहे त्यातील सामाजिक भावनिक कंगोरे कसे आहेत हे उलगडवून दाखवीत डॉ योगेश जोशी यांनी त्यांच्या कविता रसिकांसमोर सादर करीत कार्यक्रमांत रंगात आणली.


 
           निधी खाडीलकर यांनी नांदी सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. ॲड माधुरी जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या प्रसंगी प्रकाशक दिलीप महाजन ( मोरया प्रकाशन) आणि कवयित्री अनिता कळसकर यांनी मोहोर काव्यसंग्रहास  शुभेच्छा दिल्या. `मोहोर`च्या प्रकाशनानंतर कवयित्री अश्विनी मुजुमदार यांनी आपले हृद्य मनोगत व्यक्त केले. तसेच मालाताई काळे यांनी मोहोर काव्यसंग्रहातील कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ.सुनिल पांचाळ तर आभार प्रदर्शन गीतांजली मुणगेकर यांनी केले.' मोहोर' कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी डॉ वृंदा कौजलगीकर , विद्या कुलकर्णी, दिपाली काळे, अभिजित मुरांजन , अक्षरआनंद न्यूज पोर्टल संपादक हेमंत नेहते आदी मान्यवर उपस्थित होते. समारंभ यशस्वी होण्यासाठी अरविंद मुजुमदार, अक्षता मुजुमदार, श्रेया मजुमदार, श्रुती उरणकर,मधुरा पातकर  यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments