सरवली गावातील पहिली एम.बी.बी.एस डॉ. नम्रता चौधरीचे मायदेशी आगमन


■रशियातील तांबो युनिव्हर्सिटीमधून घेतले शिक्षण सरवली ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण भिवंडी मार्गावर असलेल्या सरवली गावातील पहिली एम.बी.बी.एस डॉ. नम्रता चौधरी हिचे मायदेशी आगमन झाले असून रशियातील तांबो युनिव्हर्सिटीमधून तिने शिक्षण घेतले आहे. नम्रताच्या या यशानंतर संपूर्ण जिल्हाभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.   


      सरवली येथील अध्यात्म क्षेत्रातील अग्रणी समाजसेवी चंद्रहास चौधरी यांची कन्या नम्रताने शालेय शिक्षण सुभेदारवाडा शाळेतून तर सोनावणे कॉलेजमधून १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होवून तांबो युनिव्हर्सिटीत एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. ६ वर्षे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तिने मेहनत घेतली व सर्वोत्तम यशाची मानकरी ठरली. डॉ. नम्रताला लहानपणापासून अध्यात्माची ओढ असल्यामुळे,  घरीही आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे सामाजिकसांस्कृतिकक्षेत्रामध्येही ती नेहमीच अग्रणी राहिली आहे.


डॉ. नम्रताच्या यशामध्ये तिचे वडील चंद्रहास चौधरी व आई कमला यांचा मोलाचा वाटा आहे. संपूर्ण सरवली परिसरामध्ये नम्रता ही पहिली एम.बी.बी.एस. डॉक्टर कन्या ठरली आहे. तिच्या या धवल यशामुळे परिसरातील नागरिक तिचे कौतुक करीत आहेत. डॉ. नम्रताने सामाजिकआध्यात्मिक भान ठेवून समाजाप्रती आपली वैद्यकीय सेवा समर्पित करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.दरम्यान आज ग्रामपंचायत सरवलीच्या वतीने नम्रताचा तिच्या या यशाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.  यावेळी माजी आमदार रुपेश म्हात्रे, काँग्रेस नेते दयानंद चोरगे, भाजप नेते विनोद ठाकरे, सरपंच सध्या चौधरी, उपसरपंच करण मार्के, ग्रामपंचायत सदस्य उत्तम चौधरी, भिमराव चौधरी, गणेश पाटील, राज ठाकरे, भाविका ठाकरे, सोनम पाटील, सोनाली चौधरी, सामाजिक कार्यकर्त मुकुंद चौधरी, गणेश चौधरी, तुळशीराम पाटील, रमेश पाटील, भिवंडी तालुका मनसे अध्यक्ष परेश चौधरी, संत निरंकारी मिशन कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींसह सरवली ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments