मोहन अल्टीजामध्ये अनाधिकृत बांधकाम सहाय्यक संचालकांनी सोडले मौन पालिका प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक मारुती राठोड ३० जुलै रोजी सेवानिवृत्त झाले असताना जाता जाता त्यांनी मोहन अल्टीजा या वादग्रस्त टोलेजंग इमारती संदर्भात ४० ते ५० हजार फूट अनधिकृत बांधकाम झाल्याचा पत्रकारांना निर्वाळा दिल्याने येथे खळबळ उडाली आहे.कल्याण शहरातील गांधारी येथे मोहन अल्टीजाचा कोट्यावधी रुपयांचा प्रोजेक्ट उभा करण्यात आलेला आहे. मात्र दोघा भावांमधील पार्टनरशिपचा वाद विकोपाला जाऊन भावकीने यासंदर्भात उच्च न्यायालयात अनधिकृत बांधकामासंदर्भात नगररचना विभागाला ही खेचत याचिका दाखल केली आहे. मोहन अल्टीजाचे चेअरमन जितेंद्र लालचंदाणी यांचा भाऊ महेश लालचंदाणी याने या प्रोजेक्ट संदर्भात कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडे माहितीचा अधिकारातून अनाधिकृत बांधकामाची माहिती मिळवली होती.यासंदर्भात नगरचनाकार विभाग हाताची घडी तोंडावर बोट ठेवून माहिती सांगण्यास पत्रकारांना टाळाटाळ करीत होते. शुक्रवारी नगररचना विभागातील सहाय्यक संचालक मारुती राठोड सेवानिवृत्त होत असल्याने पत्रकारांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली असता मोहन अल्टीजाबद्दल अखेर मौन सोडून अनाधिकृत बांधकाम झाल्याची माहिती पत्रकारांना दिली. शहरातील मोहन अल्टीजा मध्ये किमान अडीच लाख फूट बांधकाम करण्यात आले असून ४० ते ५० हजार फूट बांधकाम अनाधिकृत करण्यात आले असल्याचे राठोड यांनी सांगितले.सेवा निवृत्त होत असताना शुक्रवारच्या सायंकाळी सहाय्यक संचालक मारुती राठोड यांनी अखेर मौन सोडून मोहन अल्टीजा संदर्भात धक्कादायक माहिती दिल्याने पालिका प्रशासनही यामुळे अडचणीत येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments