घोडबंदर पट्ट्यात भाजपला खिंडार ओबीसी मोर्चाचे मा. अध्यक्षांसह शेकडो जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश
ठाणे (प्रतिनिधी) - एकीकडे भाजपकडून जनआशीर्वाद यात्रा काढली जात असतानाच ठाण्यात मात्र भाजपला खिंडार पडू लागले आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चाचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांच्यासह  घोडबंदर पट्ट्यातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे, ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी उपस्थित होते.               पुरुषोत्तम पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच कार्यरत होते. मात्र, मधल्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी पुन्हा स्वगृही प्रवेश केला आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य प्रभाकर रोकडे, ओबीसी मोर्चाचे  उपाध्यक्ष लक्ष्मण राठोड, अभिजीत छत्रपती पाटील, राहुल पाटील, प्रमोद जाधव, माधव जाधव यांच्यासह शेकडो जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला.             यावेळी आनंद परांजपे यांनी, घोडबंदर पट्ट्यातील ताकदवान नेतृत्व पुरुषोत्तम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. डॉ. आव्हाड यांच्या हस्ते त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आलेला आहे. पाटील यांच्यामुळे घोडबंदर पट्ट्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. पाटील यांच्यावर राष्ट्रवादीने 146 ओवळा- माजीवडा मतदारसंघाच्या विधानसभा क्षेत्राध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.              येणार्‍या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे घोडबंदर पट्ट्यातील राष्ट्रवादीचे गतवैभव पक्षाला मिळवून देतील, असा आशावाद व्यक्त केला. तर, पुरुषोत्तम पाटील यांनी, आपण मूळचे राष्ट्रवादीचेच आहोत. मात्र, एका लाटेमध्ये मी देखील वाहून गेलो होतो. ज्या लाटेत आपण वाहून गेलो होतो; ती लाट बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले.             यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस प्रभाकर सावंत, ज्येष्ठ नेते जनार्दन पाटील, सलीम पटेल, विलास पाटील, प्रवीण सिंग, रविंद्र पालव, परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख कैलास हावळे, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, कौस्तुभ धुमाळ, वॉर्ड अध्यक्ष विक्रांत चव्हाण, सुभाष आग्रे, विरु कांबळे, रामचंद्र सकपाळ , राणी देसाई आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments