भिवंडी तालुक्यातील विद्यार्थ्याच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद शाळा मालोडी सज्ज....

भिवंडी दि 16 (प्रतिनिधी ) आजवर आपण अनेक जिल्हा परिषद  शाळा व त्यातील प्राथमिक शिक्षकांचे नाविन्यपूर्ण उपक्रम पाहिले व ऐकले असतील. शाळा व समाज यांना एकत्र करून फक्त मुलांचाच नव्हे, तर गावाचा विकास साधणा-या  अवलियाची हि शाळा म्हणजे भिवंडी तालुक्यातील जि. प. शाळा मालोडी.प्रसन्न वातावरण निर्माण केले, भौतिक सामुग्रीत बदल झाला कि मुले शाळेतच रेंगाळतात  व आपणास हवे ते ज्ञान मुलात उतरवता येते.


   
             हे जाणून संपूर्ण शाळेचा चेहरा मोहरा बदलणारा हा अवलिया म्हणजे  मालोडी शाळेचे मुख्यशिक्षक श्री . ज्ञानेश्वर काठे सर.जिल्हा परिषद शाळा मालोडी साठी शासनाने २०१९ मध्ये एक वर्ग खोलीचे अनुदान मंजूर केले असता शाळेची दोन वर्ग खोल्यांची निकड पूर्ण करण्यासाठी येथील शिक्षकांनी सर्व ग्रामस्थांची सभा आयोजित करुन लोकवर्गणीतून दुसरी वर्ग खोली बांधण्याचा निश्चय केला.  ग्रामस्थ, महिला मंडळ, बचत गट आणि परिसरातील देणगीदाते यांच्या बहूमुल्य योगदानातून अत्याधुनिक अशी प्रशस्त इमारत उभारून जिल्हा परिषदेची नाविन्यपूर्ण शाळा उभारण्याचे स्वप्न साकारले.            शाळेची इमारत उभारत असताना जागेअभावी मैदानाची निर्माण झालेली समस्या शेजारील जागा मालक कै. सावित्रीबाई शांताराम पाटील यांच्याकडून मैदानासाठी जागा मिळवून मैदान उपलब्ध करण्यात श्री. काठे सर यांची मोलाची भुमिका होती.  विद्यार्थ्यांच्या आरोग्याची दक्षता म्हणून मुला-मुलींसाठी सुसज्ज असे शौचालय  "ईनर व्हिल क्लब, भिवंडी (महिला) यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात श्री.काठे सर यशस्वी झाले आहेत.              शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच यांनी दिलेल्या माहितीनुसार २००३ पासून या शाळेत आलेले शिक्षक श्री. ज्ञानेश्वर काठे यांनी शाळा व विद्यार्थी  यांच्या प्रगतीसोबत गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम व योजना शाळेत राबविण्यास सुरवात केली. त्यामुळे विद्यार्थ्यासोबत समाजही  शाळेकडे आकर्षित झाला. विविध शैक्षणिक साहित्य, पिण्याच्या शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी वॉटर प्युरीफायर, तंत्रस्नेही विद्यार्थ्यांसाठी  लॅपटॉप, मुलांना बसण्यासाठी बेंचेस,वाचनालय ई. पूर्तता समाजाच्या सहभागाने केलेली आहे.           शाळेत हस्ताक्षर, चित्रकला,वाचन अशा बहुविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. स्कॅालरशिप परीक्षेतील सलग १० वर्ष १००% निकाल आणि सलग ३ वर्ष स्कॅालरशिप प्राप्त विद्यार्थी हे शाळेच्या शिरपेचातील मुकुटमणी आहेत . आजवर या शाळेत ज्ञानाचे अमृत देणा-या गुरूजनांचे या शाळेच्या उभारणीत मोलाचे योगदान मिळालेले आहे. काठे सरांसोबत शाळेच्या शिक्षिका सौ. सावंत मॅडम यांचेही शाळेच्या विकासात मोलाचे सहकार्य आहे. आपला गाव, आपला विकास या उक्तीप्रमाणे आपली शाळा, आपली प्रगती असा निर्धार मालोडी ग्रामस्थांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments