ब्रह्मांड संगीत कट्टयावर उदंड प्रतिसादात रंगली डॉ. अनघा जोशी यांची आवाज विषयक कार्यशाळा !
ठाणे , प्रतिनिधी  :  समाजसेवेत तथा मनोरंजनक्षेत्रात अग्रेसर असलेल्या सुप्रसिद्ध ब्रह्मांड कट्टयाने संगीत शिक्षणाच्या दृष्टिने पाऊल उचलले असून ऑनलाईन माध्यमाद्वारे दर महिन्यात संगीतशिक्षणाच्या दृष्टीने विविध विषय घेऊन मोफत संगीत कार्यशाळा आयोजित केली जाते. याआधी आयोजित केलेल्या संगीत कार्यशाळा १,२,३,४ व ५ च्या उदंड प्रतिसादानंतर ऑगस्ट महिन्यातील संगीत कार्यशाळा २९ ऑगस्ट रोजी पार पडली. या कार्यशाळेत सुप्रसिद्ध कान नाक घसा व आवाज तज्ञ डॉ. अनघा जोशी यांनी मार्गदर्शन केले.           ऋजुता देशपांडे यांनी तांत्रिक तसेच सूत्रसंचालनाची दूहेरी बाजू सांभाळत अत्यंत साचेबद्ध पद्धतीने कार्यशाळेचा डोलारा सांभाळला. ऋजुता यांनी ईश्वराची आळवणी करुन कार्यशाळेचा श्रीगणेशा केला व प्रभावी निवेदनाने कार्यशाळेतील सुसुत्रता अबाधित ठेवली.            प्रथम ऋजुता यांनी मुलाखतीद्वारे अनघा यांचा शैक्षणिक व व्यावसायिक प्रवास उलगडला. अनघा या लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल व एच. एन् रिलायंस हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. तसेच त्यांचा स्वत:चा दवाखाना सायन येथे आहे. अनघा यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल्समध्ये अनेक शोधप्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच वैद्यकिय क्षेत्रातील अनेक नावाजलेल्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.             डॉ. अनघा यांनी स्लाईड शोच्या सहाय्याने कंठाची रचना व आवाजासंबंधित अनेक बाबींवर कार्यशाळेत मार्गदर्शन केले. सर्वप्रथम अनघा यांनी आवाज कसा निर्माण होतो यामागील शास्त्र प्रभावीरित्या दर्शविले. त्यानंतर त्यांनी आवाजाच्या समस्यांची कारणे व त्यावरील उपाययोजना यांचे विवेचन केले.            मुख्यत्वे गायकांनी त्यांचा आवाज कसा सुधारावा याचेही सुंदर मार्गदर्शन केले. श्वासावर नियंत्रण, डायाफ्रामॅटिक श्वासोच्छ्वास, गायनासाठी स्वतःची पट्टी ठरवणे, पट्टीची क्षमता वाढवणे, आवाजातील रेजोनेंस वाढवणे, आवाजाचे व्यायाम याविषयी सखोल माहिती दिली. तसेच वार्धक्य, मासिक पाळी, थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह अशा अनेक आजारांचा आवाजावर कसा परिणाम होतो यांवरही त्यांनी प्रकाशझोत टाकला.          या कार्यशाळेस उदंड प्रतिसाद लाभला. भारताबाहेरुन देखील कार्यशाळेत  सदस्य सहभागी झाले होते. प्रश्नोत्तरांच्या सत्रात रसिकांनी सक्रिय सहभाग दर्शवून तज्ञांकडून प्रश्नांचे शंकानिरसन करुन घेतले. अनघा यांनी यथोचित उत्तरे देऊन सहभागी सदस्यांचे समाधान केले. ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांनी वैद्यकिय दृष्टीकोनातुन उपयुक्त अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल डॉ. अनघा यांचे आभार मानले.          रसिकांचा सहभाग व आवड पहाता तसेच ज्ञानार्जनातील प्रगत पाऊल म्हणून ब्रह्मांड कट्टा पुढील कार्यशाळा लवकरच रसिकांच्या भेटीस घेऊन येणार आहे असे आवाहनही त्यांनी केले. या मोफत कार्यशाळा म्हणजे उत्तम कलाकार घडविण्यात कलासक्त ब्रह्मांड कट्टयाने उचललेला मोलाचा वाटा आहे यात वादच नाही.

Post a Comment

0 Comments