ब्रह्मांड संगीत कट्टयावर मोहम्मद रफींना संगीतमय श्रद्धांजलि!

ठाणे , प्रतिनिधी  :  ब्रह्मांड संगीत कट्टा व ऑर्केस्ट्रा 'सुनो मेरी आवाज' यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या ४१ व्या पुण्यतिथिनिमित्त ३१ जुलै रोजी ऑनलाइन माध्यमाद्वारे 'रफी के दिवाने 'हा रफी साहेबांच्या अविस्मरणीय गीतांचा कार्यक्रम  सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ब्रम्हांड कट्टयाचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांनी रफी यांना श्रद्धांजलि अर्पण करुन कार्यक्रमातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या.            सुरांचे बादशहा सावन कुमार सुपे यांनी  'मोहोब्बत के सुहाने दिन', 'इस भरी दुनिया मे', ' अकेले है चले आओ',  'आखरी गीत मोहोब्बत का' अशी रफींची सुमधुर गीते सादर करुन रसिकांचे मन जिंकले. जावेद सुहाना यांच्या 'फलक से तोडकर देखो', 'बदन पे सितारे' या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. 'लिखे जो खत तुझे', ' गुलाबी आंखे' या गीतांतुन जयंत घेगडमल यांनी आपल्या प्रासादिक गायकीचे दर्शन घडवुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली.                सुरेल गळ्याची गायिका शीतल बोपलकर हिच्या तरल आवाजातील 'एहसान तेरा होगा' व साक्षी प्रभू हिच्या सुरेल आवाजातील 'तेरी आंखो के सिवा' या गीतांनी वातावरण रफीमय करुन टाकले. यानंतर एकापेक्षा एक सरस अशा द्वंद्व गीतांचा खजिना गायकांनी रसिकांसमोर उलगडला.           शीतल व सावनकुमार यांचे 'वादा करले साजना',  जावेद व साक्षी यांचे 'मुझे कितना प्यार है', साक्षी व जयंत यांचे ' बेखुदी मे सनम', जावेद व शीतल यांचे 'अभी ना जाओ छोडकर', सावनकुमार व साक्षी यांचे ' छुप गए सारे नजारे', जयंत व शीतल यांचे 'तुझे जीवन की डोर से', सावनकुमार व साक्षी यांचे 'सुन सुन सुन', जावेद व सावनकुमार यांचे ' यादो की बारात' या गीतांनी सशक्त गायकीचे पैलू उलगडत रफींची आठवण ताजी केली. 'शिर्डीवाले साईबाबा' या रोमारोमात चैतन्य फुलवणार्‍या गीताने सावनकुमार व जावेद यांनी कार्यक्रमाची सांगता केली.             अंकुश कुमार यांनी सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. अप्रतिम संवादकौशल्य व भाषाप्रभुत्व याने नटलेल्या माहितीपूर्ण व दर्जेदार निवेदनाने कार्यक्रमाला चारचांद लावले. प्रथमेश मोहिते (कीबोर्ड), जयंत सद्रे (तबला- ढोलक), गजानन विश्वकर्मा (ऑक्टोपॅड) या वादकांनी गायकांना वाखाणण्याजोगी साथ दिली. या सुमधुर सांगितीक सादरीकरणातुन सर्व गायकांनी रफींचा सुरांप्रतिचा ध्यास आणि भावनिक उत्कटता रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवली व रफी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

Post a Comment

0 Comments