दिवा स्थानिक रहिवाशांचे साखळी उपोषण यशस्वी, क्लस्टर योजनेत मिळणार घरे... !
दिवा / ठाणे, प्रतिनिधी  :   दिवा स्टेशन ते आगासन रोड जंक्शन या रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या स्टेशन जवळील इमारतीत राहणारे रहिवाश्यांनी काल बुधवारी बेमुदत साखळी उपोषण सुरू करताच ठाणे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले.. दिव्यातील या रस्ता रुंदीकरणात बाधित होणारे रहिवाशी पहिल्या दिवसापासून क्लस्टर योजनेत समावेश करण्याचा आग्रह धरीत होते.           यापूर्वी घेतलेल्या जन सुनावणीत पालिकेने या मागणीकडे पूर्ण दुर्लक्ष केले. मागील आठवड्यात प्रशासनाने अचानक निष्कासन नोटिसा देत सर्व बाधित रहिवाशांचे पडले गाव येथील BSUP योजनेत पुनर्वसन करण्याचा घाट घातला. तातडीने सर्व रहिवाशी ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या सचिव डॉ चेतना दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकजूट झाले आणि प्रशासनाशी आंदोलनाच्या मार्गाने लढाई करण्याचा निर्धार व्यक्त केला गेला..            काल सकाळी प्रशासनाच्या दांडगाई कारभाराच्या निषेध करण्यासाठी रहिवाशांनी साखळी उपोषण सुरू केले आणि त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने लेखी पत्र देऊन सर्व बधितांचे पुन्हा सर्वेक्षण करून सर्वांसाठी क्लस्टर योजनेत जागा देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे.           याप्रकरणी रहिवाशांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे क्लस्टर मध्ये समावेश करण्याची मागणी मान्य झाल्याने डॉ चेतना दीक्षित यांनी समाधान व्यक्त केले असून ही लढाई क्लस्टर मान्य करून घेऊन क्लस्टर मध्ये कायम स्वरुपी पुनर्वसन होईपर्यंत चालू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.          आंदोलनात सर्वश्री विजय भोईर, आदेश भगत, संजय पाटील, चेतन पाटील, निलेश पाटील, पंचम आणि मनीषा ढगे व उषा पगार यांचा सक्रिय सहभाग होता, करोना मुळे पोलिसांनी परवानगी दिली नसताना हे सर्व नागरिक जिद्दीने रस्त्यावर आले आणि त्यामुळे हा नागरिकांच्या एकजुटीचा विजय असल्याची भावना दिव्यात व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments