दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

 


■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।


 ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः


अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणाची लाज आणि साधेपणा आहे, तिथे श्री कृष्ण आहे, आणि जिथे श्रीकृष्ण राहतात तिथे विजयात शंका नाही.


महाभारतातील संजय या व्यक्तीमत्वाचा हा सिद्धांत आहे. याच सिद्धांतानुसार महाभारताच्या 18 दिवसांच्या युद्धाचा निकाल लागला होता. एकूणच सत्याला अनुसरुन केले जाणारे कार्य हेच जनहिताचे असते, असे संजय याने सांगितले होते.  संजय या व्यक्तीमत्वाला दिव्यदृष्टी असल्याचे म्हटले जात होते. 


        या दिव्यदृष्टीमुळेच महाभारताचे युद्ध संजय याने दृष्टीहीन धृतराष्ट्राला सांगितलेच नव्हे तर दाखविले होते. दुर्देवाने हा संजय उपेक्षित राहिला होता. महर्षी व्यासांनी एका सामान्य विणकराच्या मुलाला दिव्यदृष्टी प्रदान केली होती. त्यामुळेच धृतराष्ट्रांनी त्याला आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले होते. अन् याच संजयने चुकीच्या गोष्टींसाठी चक्क धृतराष्ट्रालाही धारेवर धरण्याचे काम केले होते.          असाच एक संजय सध्या राज्याच्या राजकारणात कार्यरत आहे. या आधुनिक संजयने आपल्या दिव्यदृष्टीतून जे धृतराष्ट्राला दाखविले. अगदी तसेच काहीसे अंधभक्तीने दृष्टीहीन झालेल्यांना आरसा दाखविण्याचे काम डॉ. जितेंद्र सतीश आव्हाड नावाचा एक दिव्यदृष्टीधारक  करीत आहे. गेली अनेक वर्षे या माणसाचे हे काम अव्याहतपणे सुरु आहे.         असे म्हटले जाते की जे ना देखे रवी, ते देखे कवी; या प्रमाणे डॉ. जितेंद्र आव्हाड यांना जे दिसत आहे. ते कालांतराने इतरांना दिसत आहे. त्यामुळेच डॉ. आव्हाड यांना दृष्टीहीनांची वाट असे म्हणणेच संयुक्तीक ठरत आहे.

   


         पेगासीस हे प्रकरण त्याचे जीवंत आणि ताजे उदाहरण आहे. पेगासीसच्या माध्यमातून देशातील राजकीय नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे. लोकांच्या वैयक्तीक आयुष्यामध्ये डोकावण्याचे पाप केंद्रातील सरकार करीत असल्याचा गौप्यस्फोट डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सन 2016 मध्येच केला होता. महाभारतामध्ये ज्या पद्धतीने युद्ध घडल्यास कौरवांचे पतन होईल, असा अंदाज संजय याने वर्तवूनही कौरवांनी तो गांभिर्याने घेतला नव्हता.          त्याच प्रमाणे त्यावेळी केंद्रातील बड्या नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे डॉ. आव्हाड यांचा हा मुद्दा गांभीर्याने घेतला नव्हता. आज तब्बल साडेचार वर्षानंतर पेगासीस प्रकरण उघडकीस आले आहे. यातच डॉ. आव्हाडांच्या दिव्यदृष्टीची कल्पना येत आहे. या देशात ज्यावेळी मोदी सत्तास्थानी बसले त्याचवेळी हे सरकार भांडवलदारी सरकार असल्याचा दावा डॉ. आव्हाड यांनी केला होता. मात्र, त्यावेळीही बड्या नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही.         एकट्या शरद पवार म्हणजेच डॉ. आव्हाड यांना दिव्यदृष्टी प्रदान करणारे डॉ. आव्हाडांचे महर्षी व्यास यांनीच या मु्द्याला सकारात्मकता दर्शविली होती. आज सन 2014 ते 2021 या काळात मोदी-शहा-सितारामन जोडीने केंद्र सरकार हे केवळ भांडलदारांचे हित जोपासणारेच असल्याचे सिद्ध केले आहे. गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने केलेले खासगीकरण किंवा सरकारी कंपन्या विकण्याचे धोरण पाहता, डॉ. आव्हाडांनी त्यावेळी मांडलेले मुद्दे किती रास्त होते, याची प्रचिती आलेली आहे.           साधारणपणे सन 2017 चा जून महिना असेल. ठाणे शहरात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत डॉ. आव्हाड यांनी बोलताना सांगितले होते की, या देशावर आता सामाजिक कार्यकर्ते नव्हे तर भांडवलदार राज्य करतील. त्यानंतर त्यांनी सामाजिक माध्यमांवर तर आकडेवारीनुसार देशाच्या संपत्तीचे किती टक्क्यांमध्ये विक्री केली जात आहे, याची माहिती दिली होती. त्याचवेळी त्यांनी देशाच्या मालकीची विमानतळे भांडवलदारांच्या घशात घातली जातील, असेही ठामपणे सांगितले होते.        गांधी-नेहरुंचा हा देश लवकरच नथुरामाचा होईल, असेही ते म्हणाले होते. अवघ्या काही दिवसांतच या देशात नथुरामाचे पहिले मंदिरही उभे राहिले अन् भाजपच्या एका महिला नेत्याने चक्क गांधीजींचा पुतळा तयात करुन त्यास गोळ्या घातल्या होत्या. अन् आज महाराष्ट्राची शान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळही अदानीच्या हाती गेले आहे.


 

      2 जून 2014 हा दिवस महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला काळे फासणारा दिवस होता. याच दिवशी आयटी अभियंता असलेला मोहसीन शेख याला जमावाने रात्रीच्या सुमारास ठेचून मारले. या झुंडशाहीचा निषेध करताना डॉ. आव्हाड यांनी सर्वात आधी या देशामध्ये झुंडींकडून विशिष्ठ जातीधर्माच्या लोकांचे बळी घेतले जातील; त्यामुळे सावध रहा, असा इशारा दिला होता.           अन् त्यांच्या या इशार्‍याची सत्यता लागलीच दिसून आली. जुनैद खान, नितीन आगे, सत्यभामा, अयूब मवाटा, अखलाक अशा अनेकांना झुंडशाहीने गिळंकृत केले. म्हणूनच त्यावेळी देशातील विचारवंतांनी सुरु केलेल्या नॉट इन माय नेम या अभियानामध्ये डॉ. आव्हाड यांनाच विचारवंतांनी आपल्या मंचावर स्थान दिले होते.         शाहीनबाग आंदोलनाला ज्यावेळी बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी महाराष्ट्रात सर्वात आधी धावून आले ते डॉ. आव्हाड!  गेली अनेक वर्षे भारतात अस्तित्व करणार्‍या आणि भारतवासी झालेल्या लोकांना देशाबाहेर काढण्याचा कट केंद्र सरकारने सीएए आणि एनआरसीच्या माध्यमातून रचला. त्यावेळी काळाची पावले उचलून महाराष्ट्र पेटवून काढण्याचे काम डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.          छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍यांना महाराष्ट्र भूषण देण्यात आला. त्यावेळी ज्या पद्धतीने या शिवप्रेमीने रान पेटवले होते. अगदी तसेच रान सीएए आणि एनआरसीच्या विरोधात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पेटवले. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या नागरिकांसाठी रस्त्यावर उतरण्याची हिमंत फक्त आणि फक्त डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीच दाखविली.          जुगारात पराभूत झाल्यानंतर पांडव 13 वर्षांच्या वनवासाला रवाना झाले. त्यावेळी दिव्यदृष्टी धारण करणार्‍या संजय याने धुतराष्ट्राला असे म्हटले होते की, आताा कुरुवंशाचा समूळ नाश अटळ आहेच; शिवाय, सामान्य जनताही नाहक मारली जाईल.  सन 2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर असाच काहीसा इशारा  डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. त्यांच्या या इशार्‍याची सत्यता आता पटत आहे.          मॉब लिचिंग असो, इंधनाची दरवाढ असो,  अगर शहरी नक्षलवादावर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केलेले भाष्य तंतोतंत खरे ठरत आहे. एकंदर पाहिल्यास जितेंद्र आव्हाड नावाच्या या माणसाला दिव्यदृष्टीच प्राप्त झाली आहे, असे म्हटल्यास अनुचित ठरणार नाही. या दिव्यदृष्टी धारण केलेल्या   डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या दिव्यदृष्टीचा अपेक्षित फायदा महाराष्ट्राला घेता आलेला नाही.        हीच खरी शोकांतिका आहे, असे म्हणता येणार नाही तर ते महाराष्ट्राचे दुर्देवं आहे, असेच या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. गांधींच्या वाटेवर चालणारे मंडेला, सुभाषबाबूंची वाट धरणारे  फिडेल, चे गव्हेरासारखा या सर्व क्रांतीकारी नेत्यांच्या  पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करणार्‍या डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आक्रमक, अभ्यासू अन् धडाडीचा पुढील शंभर वर्षे महाराष्ट्रालाच नव्हे तर सबंध देशाला फायदा व्हावा, याच शुभेच्छा!


- संजय भालेराव

Post a Comment

0 Comments