जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्याचा सहा महिन्यांचा कृती आराखडा तातडीने सादर करा - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
ठाणे, दि. २६  :  ग्रामस्थांना स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत कामांचा सप्टेंबर ते मार्च या सहा महिन्यांचा कृती आराखडा तातडीने जिल्हा परिषदेकडे सादर करावा. याकामांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे दिले.           जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची दुसरी बैठक आज जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जल जीवन मिशन कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राधेश्याम आडे यांच्यासह पाचही तालुक्यांचे गट विकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.           जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यावेळी म्हणाले, जल जीवन मिशन हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. त्याअंतर्गत देण्यात आलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी तालुका यंत्रणेने प्रयत्न करणे आवश्यक आहे.  कोरोनाची साथ, पावसाळा यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी विलंब न होता पुढील सहा महिन्यांचा आराखडा तातडीने जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात यावा. त्यानुसार कामे पूर्ण होतील यासाठी अधिकचे लक्ष पुरवावे. जेणे करून ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळू शकेल.          या मिशनअंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा पाठपुरावा करावा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दांगडे यांनी सांगितले.          यावेळी नळ जोडणी नसलेल्याअंगणवाडी, शाळा त्याचबरोबर पाणी गुणवत्ता नमुना तपासणी, पाणी गुणवत्ता स्त्रोतांचा स्वच्छता सर्वेक्षण आढावा, घरगुती नळजोडणी आदीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments