मोठी गृहसंकुले आणि कॉम्प्लेक्स यामध्ये रानभाज्या पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न करा राज्यस्तरीय रानभाज्या महोत्सवाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उदघाटन


कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड करण्याचे जिल्हा कृषी विभागाला निर्देश राज्यभरातील रानभाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांशी साधला संवाद...


ठाणे , प्रतिनिधी  :- शहरामधील मोठमोठ्या गृहसंकुलामध्ये रानभाज्या पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न करा असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिले. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आज ठाण्यात राज्यस्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन आज पालकमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी हे निर्देश दिले.             33 जिल्ह्यातील 230 तालुकामध्ये आज एकाचवेळी या रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यात अळू, हळद, करटूली, पातूर, बांबू, अंबाडी, करवंद अशा जवळपास 100 ते 150 प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्यांचा समावेश करण्यात आला होता. 2005 पासून सुरू करण्यात आलेला हा महोत्सव दरवर्षी राज्यभरात आयोजित करण्यात येतो. ठाण्यातील वर्तक नगरमध्ये 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे.             आज या महोत्सवाच्या निमित्ताने प्रगतशील शेतकरी आणि रानभाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या बचत गटांचा पालकमंत्री शिंदे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. त्यासोबत रानभाज्या नक्की कशा  बनवाव्या याची माहिती देणाऱ्या एका विशेष माहिती पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.             ठाणे आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांचे पालकत्व सांभाळणाऱ्या शिंदे यांनी या दोन्ही जिल्ह्यांतील रानभाज्या महोत्सवाचा आढावा घेतला, रानभाज्या या एवढ्या वेगळ्या पद्धतीचा असतात हे या महोत्सवाच्या निमित्ताने नव्याने समजते या भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्मही असल्याने त्याची उपयुक्तता शहरातील लोकांपर्यंत पोहचायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
          गडचिरोली येथील मूलचेरा येथे स्ट्रॉबेरी लागवड असो किंवा गडचिरोली येथील बारडोली जांभळे नागपूरमध्ये जाऊन विक्री करणे असो असे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग आपण केले त्याचा शेतकऱ्यांना त्यांच्या मलाच चांगलं मूल्य मिळालं. नेमकी हीच गोष्ट आता रानभाज्याच्या बाबतीत देखील करावी लागेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रानभाज्या या पावसाळ्यात उगवत असल्या तरीही त्यांची लागवड इतरवेळीही करता येईल आणि या भाज्यांना इतर भाज्याएव्हढं मूल्य कस मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितलं. 
           रानभाज्या मधील टाकळा, शेवगा यासारख्या भाज्या इम्युनिटी बूस्टर आहेत आशा भाज्याची माहिती आणि ती करण्याची पध्दत लोकांपर्यंत पोहचायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक केली. एसआरटी म्हणजेच सगुणा राईस टेक्निकची शोधून काढणारे शेखर भडसावळे यांच्यासारख्या लोकांची मदत घेऊन आधुनिक शेतीची कास धरण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.           आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्याच जीवनमान सर्व बाजूनी उंचावण्याची गरज आहे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यासोबतच यापुढे शहरात ठिकठिकाणी दर आठवड्याला भरवल्या जाणाऱ्या आठवडी बाजारात यापुढे रानभाज्याची विक्री देखील करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली.              कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी या महोत्सवात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. आशा उपक्रमातून निसर्गाचा हा ठेवा लोकांपर्यंत पोहचवण्याची संधी मिळते अशी भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. शहरात हा रानमेवा पोहोचावा यासाठी अजून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यासाठी ठाण्यासह इतर महानगरपालिका मध्ये त्यांची विक्री करण्याची संधी मिळायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.            या कार्यक्रमाला कृषिमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, ठाण्याचे जिल्हा कृषी अधिकारी अंकुश माने आणि जिल्ह्यातून आलेले शेतकरी आणि बचत गटांचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments