शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत आठ कोटी रखड लेल्या भात बोनसची कपिल पाटील यांच्या कडून दखल
भिवंडी, दि. १ (प्रतिनिधी)  :  एकाधिकार व आधारभूत अंतर्गत भात विक्री करणाऱ्या भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत बोनस मिळणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दखल घेतल्यानंतर आदिवासी विकास महामंडळाची यंत्रणा हलली.        आदिवासी विकास महामंडळा कडून शेतकऱ्यां कडून भात खरेदी केली जाते. या खरेदीसाठी प्रती क्विंटल प्रोत्साहनपर राशी म्हणून ७०० रुपये बोनस दिला जातो. मात्र, आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून बोनस दिला जात नव्हता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दखल घेतली.           त्यानंतर वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात शुक्रवारी रक्कम जमा झाली. आता भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत सुमारे आठ कोटींची रक्कम जमा होणार आहे. या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात पैसे उपलब्ध होतील.

Post a Comment

0 Comments