27 गावातील कचरा प्रश्न गंभीर त्रस्त महिलांनी लावली कचऱ्याला आग


■नगरसेवक कुणाल पाटील यांनी केली प्रशासनाच्या कामावर टीका...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  27 गावातील कचरा प्रश्न गंभीर झाला असून कचऱ्याच्या या त्रासाने त्रस्त झालेल्या महिलांनी या कचऱ्याला आग लावली असून स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी पालिका प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 27 गावांमधील  कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून येथील रस्त्यांवर जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तरीदेखील पालिकेच्या वतीने कचरा उचलण्यात येत नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. या समस्येकडे पालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधून देखील कचरा उचलला जात नसल्याने आज अखेर नांदीवली तलाव  येथील साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाजवळ नगरसेवक कुणाल पाटील यांनी याठिकाणी आंदोलन केले. तर त्रस्त महिलांनी या कचऱ्याला आग लावून आपला संताप व्यक्त केला.            कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे कल्याण-डोंबिवली महापालिकेत शून्य कचरा मोहीम राबवली जात असून या मोहिमे करता नागरिकांकडून सहाशे रुपये कर आकारण्यात येत आहे. मात्र पालिकेच्या नियोजन शून्य कारभरामुळे या मोहिमेचे तीन तेरा वाजले आहेत. पालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये  जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असल्याने संतप्त महिलांनी कचरा जाळत आपला निषेध व्यक्त केला असून पालिका अधिकाऱ्यांनी यातून तरी काही बोध घेऊन नागरिकांची कचऱ्याच्या त्रासातून मुक्तता करण्याची मागणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments