वसई - ठाणे - कल्याण जल वाहतुकीच्या मार्गावर जेट्टीच्या कामाला लवकरच होणार सुरुवात - खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय जल संधारण मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची घेतली भेट
ठाणे,  प्रतिनिधी  ; -  गेल्या अनेक वर्षापासून जलवाहतूक सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना लवकरच जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आज केंद्रीय जलसंधारण मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेऊन जल वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या जेट्टीचे काम सुरु करण्यासाठी नुकताच महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने सविस्तर प्रकल्प अहवाल एप्रिल २०२१ मध्ये सागरमाला प्रकल्प विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.


 

           त्याला तत्काळ मंजुरी देऊन अनुदान प्राप्त करून द्यावे. जेणेकरून कामाला लवकरात लवकर सुरुवात होऊ शकेल अशी विनंती पत्राद्वारे केली. त्यावर केंद्रीय जलसंधारण मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जेट्टीच्या कामाला तात्काळ सुरुवात व्हावी यासाठी मंजुरी देऊन अनुदान वर्ग करण्यात यावा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.         खासदार राजन विचारे हे जलवाहतूक प्रकल्प सुरू करण्यासाठी आमदार असल्यापासून प्रयत्न करीत आहेत. खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व त्यावेळी चे तत्कालीन ठामपा आयुक्त संजीवजी जयस्वाल यांनी ठाणे जिल्ह्याला लाभलेला खाडी किनारा लक्षात घेऊन जलवाहतूक सुरू करण्यासाठी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे दि. २८ जुलै २०१६ रोजी सादरीकरण करण्यात आले. ७ महानगरपालिकेला जोडणारा हा जलवाहतूक प्रकल्प ठाणे महानगरपालिकेने तयार केल्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे मा. नितीनजी गडकरी यांनी कौतुक केले होते.

 


         पहिल्या टप्प्यासाठी १०० टक्के व द्वितीय टप्प्यासाठी ५० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने प्रकल्प अहवाल तयार केला आणि ऑक्टोबर २०१८ केंद्रशासनाला सादर करून मंजुरी मिळवली. परंतु हे काम सुरु करण्यासाठी प्रत्यक्ष लागणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी विलंब लागत होता.         आज खासदार राजन विचारे यांनी या कामाला पुन्हा गती देऊन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय जलसंधारण मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेऊन पत्राद्वारे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाला परवानगी देऊन अनुदान प्राप्त करून द्यावे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प अहवाल बनविण्यासाठीही अनुदान प्राप्त करून द्यावे जेणेकरून निधी अभावी बंद पडलेले काम सुरु होईल अशी विनंती केली.         या पत्रामध्ये त्यांनी शहरातील वाढत्या लोक संख्येमुळे शहरातील वाहतुकीवर पडणारा प्रचंड ताण त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. तसेच ठाणे व शेजारी असणारे इतर जिल्हयांमध्ये अशी काही ठिकाणे आहेत की, जी रस्त्याने प्रवास केल्यास मोठे अंतर कापावे लागते व पर्यायाने जास्त वेळ व इंधन वाया जाते. यामुळे प्रदूषणामध्ये वाढ होत आहे.         या ठाणे जिल्ह्याला लाभलेला खाडी किनारा लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेने 7 महानगरपालिकेला जोडणारा जल वाहतूक प्रकल्पाचे २८ जुलै २०१६ रोजी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे सादरीकरण   करून या प्रकल्पाला मंजुरी मिळवली.यामध्ये पहिला टप्पा वसई- ठाणे -कल्याण असा असणार आहे व दुसरा टप्पा ठाणे ते मुंबई व व नवी मुंबई असे दोन मार्ग असणार आहे.         सदर पहिल्या टप्प्यातील जेट्टीचे काम महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत हाती घेण्यात आले असून त्यामधील वसई -ठाणे -कल्याण या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी राष्ट्रीय जलमार्ग क्र.५३ मध्ये जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याकरिता खालील १० ठिकाणी जेट्टी व तत्सम सुविधा निर्माण करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येऊन केंद्र शासनास सादर करण्यात आला असे पत्रामध्ये म्हंटले आहे.१. वसई २.मीरा भाईंदर ३. घोडबंदर ४.नागलाबंदर  ५.कोलशेत ६.काल्हेर ७.पारसिक ८.अंजुर दिवे  ९.डोंबिवली १०. कल्याण


सदर प्रकल्पातील काम तात्काळ सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात खालील ४ ठिकाणी जेट्टी


१. डोंबिवली जि.ठाणे येथे जेट्टी बांधकाम करणे.


२. कोलशेत जि. ठाणे जेट्टी बांधकाम करणे.


३. मीरा भाईंदर जि. ठाणे जेट्टी बांधकाम करणे.


४. काल्हेर जि. ठाणे जेट्टी बांधकाम करणे.


बांधण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल रु. १००.०० कोटी रकमेचा एप्रिल २०२१ मध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत प्रकल्पाचा नव्याने केलेला डीपीआर संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट केंद्रशासनाच्या सागरमाला प्रकल्प योजना या विभागाला सादर करण्यात आलेला आहे.


       

          ह्या मार्गावर जलवाहतुकीची सेवा उपलब्ध करुन दिल्यास वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच किनारपट्टीवरील नागरीकांना पर्यटकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. तरी सदर जलवाहतुकीच्या प्रकल्पास सागरमाला योजनेअंतर्गत मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन द्यावा जेणेकरून या प्रत्यक्षात कामास लवकरात लवकर सुरुवात होऊ शकेल. यासाठी आपण खात्याचे प्रमुख असल्याने आपल्या संबंधित विभागाला काम सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments